Site icon wartaa.in

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये द्या! 33 टक्के ची अट शिथिल करून आर्थिक मदत देण्याची आमदार राजकुमार बडोले यांची मागणी .

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये द्या! 33 टक्के ची अट शिथिल करून आर्थिक मदत देण्याची आमदार राजकुमार बडोले यांची मागणी .
Share on

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी /मोरगाव

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये द्या!

33 टक्के ची अट शिथिल करून आर्थिक मदत देण्याची आमदार राजकुमार बडोले यांची मागणी

सडक अर्जुनी

राज्यात यंदा खरीप हंगामात निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती, विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने 33 टक्के पेक्षा अधिक नुकसानीची अट शिथिल करून सरसकट पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी ठाम मागणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केली आहे.

राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असून अनेक भागांत अतिवृष्टी, रोगराई आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून शेतकऱ्यांना घोषित आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
विशेषतः गोंदिया हा जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित धान पिकावर अवलंबून असते. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात धान पिकावर तुडतुडा, करपा, मावा यांसारख्या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. आधीच कर्जबाजारीपणा, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट अधिक गंभीर बनले आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला, तरी शेतकऱ्यांच्या घरात मात्र आर्थिक विवंचनेमुळे चिंतेचे वातावरण आहे. अशा वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या अटींमध्ये न अडकवता तातडीने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. पंचनामे पूर्ण होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा शासनाने शेतकऱ्यांची विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून ती दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा करावी. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी काहीसा आधार मिळेल.

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या संकटाच्या काळात शासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी पंचनाम्याच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत दिवाळीपूर्वी सरसकट पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी केली आहे.

Exit mobile version