महिलांच्या आरोग्यावर भर : गावागावात ॲनिमिया तपासणी करा – मुकाअ एम. मुरूगानंथम

wartaa.in
Share on

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे महत्त्वाकांक्षी अभियान असून, त्यामध्ये जनकल्याणाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य, ग्रामविकास, लोकसहभाग, रोजगारनिर्मिती, शिक्षण, तसेच सामाजिक न्यायाशी संबंधित विविध घटकांवर विशेष भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी गावागावात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

गोंदिया, ता. १० — मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ॲनिमिया (रक्ताल्पता) तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, गावातील प्रत्येक महिला सुदृढ असावी, यासाठी प्रत्येक महिलेची रक्त तपासणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी दिले. यासाठी गावातील चौकाचौकांत, वस्तीवस्त्यांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, जेणेकरून एकही महिला तपासणीपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत गंगाझरी व ग्रामपंचायत लोहारा येथे शुक्रवारी (ता. ९) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक उपस्थित होते. या बैठकीत अभियानाच्या विविध घटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ योजनांची अंमलबजावणी न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देते, असे सांगताना मुरूगानंथम म्हणाले की, पाणीपट्टी, घरपट्टी व इतर करांचे नियमित संकलन तसेच लोकवर्गणीतून गावात प्रत्यक्ष भौतिक बदल घडून येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी कर भरण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या अभियानात अगदी लहान-लहान बाबींवरही गुणांकन पद्धती लागू असून, हे गुण अर्जित केल्यास राज्यस्तरावर तब्बल पाच कोटी रुपयांचे पारितोषिक मिळू शकते, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करून अधिकाधिक गुण मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, तसेच नाविन्यपूर्ण योजना राबविणे यावरही भर देण्यात आला. गावातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र तयार करून घेणे अनिवार्य असून, एकही विद्यार्थी जात प्रमाणपत्राशिवाय राहणार नाही, याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

जात प्रमाणपत्र तयार करताना आवश्यक कागदपत्रे किंवा पुरावे उपलब्ध नसल्यास कोणत्या प्रकारची कार्यवाही करता येऊ शकते, याबाबतही मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच ‘लखपती दीदी’ योजना, उमेद अंतर्गत संयोगिनी व बचत गटांच्या महिलांचा आढावा घेण्यात आला, तर अंगणवाडी संदर्भात अंगणवाडी सेविकांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.

आढावा बैठकीत ग्रामविकास अधिकारी श्री वैद्ये, गंगाझरी ग्रामपंचायतीचे सरपंच सोनू घरडे, लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र ढेकवार, पंचायत समिती गोंदियाचे विस्तार अधिकारी जयंत तिडके, माहिती-शिक्षण-संवाद तज्ञ अतुल गजभिये, ग्रामपंचायत अधिकारी धर्मदीप महाकाळकर, रामा जमईवार, तसेच ग्रामपंचायतींचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *