चिमुकल्याच्या मृत्यूनंतर 9 दिवसांच्या थरारानंतर अखेर त्या नरभक्षी बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद
तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगाव परिसरात मागील काही दिवसांपासून भीती, दहशत आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं होतं. दि. 9 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास खडकी-डोंगरगाव येथील एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. क्षणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत त्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं असून, परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या भीषण घटनेनंतर तिरोडा तालुक्यातील खडकी-डोंगरगावसह आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं. नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवणं तात्काळ बंद केलं होतं. सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडणं टाळलं जाऊ लागलं. शेतात कामासाठी जाणं, गुरेढोरे चारायला सोडणं, महिलांनी एकट्यानं घराबाहेर पडणं यावरही मर्यादा आल्या. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या. खडकी-डोंगरगाव परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, कॅमेरे आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. तसेच दिवस-रात्र गस्त वाढवण्यात आली. रात्रीच्या वेळी सर्च ऑपरेशन राबवून संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.
या संपूर्ण कालावधीत वनविभागावर मोठा ताण होता. नागरिकांचा वाढता रोष, भीतीचं वातावरण आणि पुन्हा कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते. गावकऱ्यांशी संवाद साधत, त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं जात होतं. वनविभागाने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने संपूर्ण परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला.
जवळपास नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर त्या हिंसक आणि नरभक्षी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. बिबट्या पकडल्याची बातमी समजताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अनेक दिवसांपासून दहशतीखाली असलेले नागरिक काहीसे निर्धास्त झाले. बिबट्याला पकडल्यानंतर वनविभागाच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
मात्र, या घटनेने वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आणला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी वनविभागाने अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

