आमगाव–गोंदिया मार्गावर थरार! महाकाली पेट्रोलपंपाजवळ ७ ते ८ जणांचा बोरवेल गाडीचालकावर हल्ला, रोख रकमेची लूट

wartaa.in
Share on

आमगाव–गोंदिया मार्गावरील महाकाली पेट्रोलपंप परिसरात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात ७ ते ८ आरोपींनी संगनमताने एका बोरवेल गाडीचालकावर अचानक हल्ला करत त्याच्याकडील ५ हजार रुपये रोख रकमेची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

या घटनेतील फिर्यादीचे नाव मधियालगन जयारमन (वय ३६) असून ते मूळचे तमिळनाडू राज्यातील नमक्कल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सध्या ते आमगाव तालुक्यातील महाकाली पेट्रोलपंप परिसरात बोरवेलच्या कामासाठी वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी रात्री १० ते १०:३० वाजताच्या सुमारास ते आपल्या बोरवेल गाडीच्या कॅबिनमध्ये झोपलेले होते.

त्याचवेळी शर्ट-पँट व जॅकेट परिधान केलेले अज्ञात ७ ते ८ आरोपी अचानक घटनास्थळी आले. त्यांनी फिर्यादीला “बाहर निकल” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली व जबरदस्तीने कॅबिनमधून बाहेर काढले. यानंतर दोन आरोपींनी जयारमन यांना थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना ढकलत बोरवेल गाडीवर आदळण्यात आले, ज्यामुळे ते घाबरून गेले.

या गोंधळाचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील ५,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ही संपूर्ण घटना अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

दरम्यान, महाकाली पेट्रोलपंपावर कार्यरत असलेले दोन कर्मचारी आवाज ऐकून घटनास्थळी धावून आले. मात्र आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करत दहशत निर्माण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आरोपींनी सीजी ०४ क्यूई १५१६ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या कारने तसेच एमएच २१ एएच ९१०० क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने घटनास्थळावरून धूम ठोकली.

या घटनेची नोंद दि. ०७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ०२:५० वाजता आमगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात लूट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

या प्रकरणाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे असून, तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डाबेराव यांच्याकडे देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, वाहन क्रमांकांच्या आधारे शोधमोहीम राबवणे आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाकाली पेट्रोलपंपासारख्या वर्दळीच्या व संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *