भागवत यज्ञ सप्ताहातून समाजात संस्कार व एकतेची भावना दृढ होते – आमदार राजकुमार बडोले यांचे भावनिक प्रतिपादन

wartaa.in
Share on

भागवत यज्ञ सप्ताहातून समाजात संस्कार व एकतेची भावना दृढ होते – आमदार राजकुमार बडोले, असे प्रतिपादन आमदार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोर तालुक्यातील माहूरकुडा येथे आयोजित भागवत यज्ञ सप्ताहाच्या समारोपप्रसंगी केले. आत्मप्रवर्तक भजनी मंडळ माहुरकुडा तसेच ग्रामवासी भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा भागवत यज्ञ सप्ताह (विठ्ठल अवतार कथा) दि. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.

सात दिवस चाललेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप रविवार, 4 जानेवारी रोजी झाला. या समारोप कार्यक्रमास आमदार राजकुमार बडोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भागवत यज्ञासारखे धार्मिक सप्ताह हे केवळ अध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर समाजात संस्कार, एकात्मता, सद्भावना आणि नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस मानसिक तणावात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत अध्यात्माची जोड अत्यावश्यक असून, भागवत कथा, कीर्तन, भजन यांमुळे मनःशांती मिळते आणि समाजात सलोखा निर्माण होतो, असे आमदार बडोले यांनी स्पष्ट केले. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील आदर्श, त्यांचे विचार आणि कर्मयोग आजच्या पिढीने आत्मसात केल्यास जीवन अधिक सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या भागवत यज्ञ सप्ताहात प्रवचनकार हभप गि-हीपुंजे महाराज यांनी आपल्या अमृततुल्य वाणीद्वारे भक्तीरसाचा वर्षाव केला. त्यांच्या प्रवचनातून अध्यात्मिक विचारांसह सामाजिक संदेशही ग्रामवासीयांपर्यंत पोहोचले. तसेच गुरुमाऊली संत शिरोमणी अमररत्न तवाडे बाबा यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील प्रवचनांनी माहूरकुडा वासीयांना मंत्रमुग्ध केले.

या धार्मिक सप्ताहामुळे गावातील नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांना एकत्र येण्याची संधी मिळाली. भागवत यज्ञ सप्ताहातून समाजात एकतेची भावना अधिक दृढ झाली, असे अनेक ग्रामस्थांनी सांगितले. समारोपाच्या दिवशी भजन, कीर्तन, गोपाल काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.

या कार्यक्रमास गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते, जयश्रीताई देशमुख, पंचायत समिती माजी सभापती सविताताई कोडापे, सरपंच लक्ष्मीकांत नाकाडे, बाजार समिती संचालक व्यंकट खोब्रागडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक, महिला व युवक उपस्थित होते.

यज्ञ सप्ताह यशस्वी करण्यासाठी आत्मप्रवर्तक भजनी मंडळाच्या अध्यक्ष सौ. इंदुबाई नाकाडे, रामनाथ कापगते, चंद्रकलाबाई येरणे, केशव बोरकर, रेवणाथ ठाकरे, तुषार नाकाडे, पुरुषार्थ नेवारे तसेच संपूर्ण आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. आमदार राजकुमार बडोले यांनी सर्व आयोजक, सहकार्य व ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन केले.

अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावागावात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, भागवत यज्ञ सप्ताहातून समाजात संस्कार व एकतेची भावना दृढ होते, हे पुन्हा एकदा माहूरकुडा येथे सिद्ध झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *