एओपी गोठणगाव परिसरातील दुर्गम आदिवासी भागात पोलीस पुढाकारातून 48 नागरिकांना मिळाली नवी दृष्टी

wartaa.in
Share on

दादालोरा पोलीस खिडकी योजना ही केवळ एक प्रशासकीय योजना न राहता, गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी बहुल भागातील नागरिकांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या या अभिनव उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण पुन्हा एकदा समोर आले असून, गोठणगाव सशस्त्र दूरक्षेत्र परिसरातील तब्बल 48 रुग्णांना निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे नवी दृष्टी मिळाली आहे.

गोंदिया, दि. 10 — गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या दादालोरा पोलीस खिडकी योजनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासन केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित न राहता आरोग्य, शिक्षण व सामाजिक जाणीव या क्षेत्रांतही भरीव योगदान देत असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोठणगाव येथील दुर्गा चौकात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिराचा परिसरातील सुमारे 240 नागरिकांनी लाभ घेतला. तपासणीनंतर त्यापैकी 57 रुग्णांना पुढील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. यातील 48 रुग्णांनी स्वेच्छेने शस्त्रक्रियेसाठी संमती दिली, तर उर्वरित रुग्ण विविध कारणांमुळे पुढील उपचारासाठी जाऊ शकले नाहीत.

या 48 रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या विशेष बसद्वारे नागपूर येथे नेण्यात आले. सर्व रुग्णांवर निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी व तपासणीनंतर आज दिनांक 10 रोजी त्याच बसने सर्व रुग्णांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे परत पाठविण्यात आले.

आदिवासी बहुल व दुर्गम भागात अद्यापही आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अनेक नागरिक अज्ञान, आर्थिक अडचणी किंवा आरोग्याबाबत असलेल्या अनास्थेमुळे उपचारापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत दादालोरा पोलीस खिडकी योजना ही योजना नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.

या संपूर्ण उपक्रमासाठी गोठणगाव एओपीचे प्रभारी अधिकारी पीएसआय निलकंठ गित्ते व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. रुग्णांची नोंदणी, तपासणी, वाहतूक, समुपदेशन आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी या प्रत्येक टप्प्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी मनापासून कौतुक व्यक्त केले आहे.

पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून आरोग्य क्षेत्रात होत असलेली ही जनजागृती भविष्यात अनेक नागरिकांचे जीवन प्रकाशमान करेल, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *