देवरी तालुक्यातील पदमपूर येथील घटना : मुरूम खड्ड्यात बुडून इसमाचा मृत्यू

wartaa.in
Share on

देवरी तालुक्यातील पदमपूर येथील घटना गोंदिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, गावालगत असलेल्या मुरूम खड्ड्यातील पाण्यात बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी, ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिरपूर बांध अंतर्गत येणाऱ्या ग्राम पदमपूर येथील आहे. आसाराम झिटू आचले (वय ५६) असे मृतकाचे नाव असून, त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आसाराम झिटू आचले हे ८ जानेवारी २०२६ रोजी गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान गावालगत असलेल्या मुरूम खड्ड्याजवळ प्रातःविधीसाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते दिवसभर घरी परत न आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता वाढू लागली. त्या दिवशी गावात पुनर्विवाहाचा कार्यक्रम असल्यामुळे आसाराम हे वऱ्हाड्यांसोबत वरातीत गेले असावेत, असा अंदाज कुटुंबातील सदस्यांनी बांधला होता.

परंतु संध्याकाळपर्यंत विवाह कार्यक्रम आटोपून सर्व लग्न मंडळी गावात परत आली, तरीही आसाराम घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत गावात आणि आसपासच्या परिसरात शोधाशोध करण्यात आली; मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी देवावर भरवसा ठेवत रात्र काढली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास गावातील एक नागरिक प्रातःविधीसाठी त्याच मुरूम खड्ड्याकडे गेला असता, त्याला खड्ड्यात साचलेल्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्याने तात्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली. काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले आणि खात्री केल्यानंतर सदर मृतदेह आसाराम झिटू आचले यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती त्वरित देवरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात आसाराम झिटू आचले हे मिर्गी (अपस्मार) या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. प्रातःविधी दरम्यान मिर्गीचा झटका आल्यामुळे ते पाण्यात पडले असावेत आणि बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पदमपूर गावात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतकाच्या कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटामुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास देवरी पोलीस करीत असून, घटनेबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *