गोंदिया लाचलुचपत प्रकरण : PMKSY अनुदानासाठी शेतकऱ्याकडून लाच मागणारा उपकृषी अधिकारी ACB च्या जाळ्यात
गोंदिया लाचलुचपत प्रकरण जिल्ह्यातील कृषी विभागाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी लाच मागणाऱ्या उपकृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली.
सालेकसा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले उपकृषी अधिकारी (वर्ग–3) रमेश मारोतराव टाकरस (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी वर्गात समाधानाची भावना व्यक्त होत असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ACB च्या ठोस कारवाईचे स्वागत केले जात आहे.
तक्रारदार शेतकरी सालेकसा तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्याकडे सुमारे 5 एकर शेती आहे. शेती मशागतीसाठी त्यांच्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – PMKSY वैयक्तिक लाभार्थी योजना 2.0 अंतर्गत ट्रॅक्टर रोटावेटरसाठी केंद्र शासनाकडून 40,000 रुपयांचे अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्यांनी 17 जून 2025 रोजी गोंदियातील शिव अग्रो या अधिकृत विक्रेत्याकडून 1 लाख 5 हजार रुपयांचा रोटावेटर खरेदी केला. त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रांसह अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सालेकसा येथे सादर करण्यात आला.
याच टप्प्यावर आरोपी उपकृषी अधिकारी रमेश टाकरस यांनी अर्ज मंजूर करून अनुदान मिळवून देण्यासाठी सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाच देण्यास नकार दिला, मात्र तरीही आरोपीकडून वारंवार तगादा लावण्यात येत होता.
अखेर 18 डिसेंबर 2025 रोजी अनुदानाची रक्कम तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा झाली. तरीही आरोपी अधिकाऱ्याने “काम झाले आहे, पैसे द्यावे लागतील” असे सांगत लाच देण्यासाठी दबाव वाढवला. 12 जानेवारी 2026 रोजी आरोपीने तक्रारदारांना पैसे घेण्यासाठी बोलावले.
लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत ACB पथकाने 12 व 16 जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान आरोपीने 5 हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
सापळा कारवाई दरम्यान आरोपीने प्रत्यक्ष 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच, पंचासमक्ष ACB पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, त्याच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात येणार आहे.
ही संपूर्ण कारवाई गोंदिया ACB चे पोलीस निरीक्षक उमाकांत उगले व अरविंद राऊत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात चंद्रकांत करपे, संजय बोहरे, मंगेश कहाळकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, संगीता पटले, रोहिणी डांगे आणि दीपक बाटबर्वे यांचा समावेश होता. या कारवाईसाठी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या घटनेमुळे कृषी विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लाच मागणीविरोधात थेट ACB कडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

