रानडुकराची अवैध शिकार व मांस विक्री प्रकरणी सहा जण ताब्यात; देवरी–आमगावात वन्यजीव तस्करीचा धक्कादायक पर्दाफाश

wartaa.in
Share on

रानडुकराची अवैध शिकार व मांस विक्री प्रकरणी सहा जण ताब्यात घेतल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर वनपरिक्षेत्र देवरी अंतर्गत येणाऱ्या ग्राम मुल्ला/हेटी येथे वन विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत रानडुकराची बेकायदेशीर शिकार व मांस विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रशासनाची ठाम भूमिका समोर आली आहे.

दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी, रविवार सकाळच्या सुमारास वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देवरी तालुक्यातील ग्राम मुल्ला/हेटी येथे एका घरात वन्यप्राण्याचे मांस आणण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उत्तर देवरी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. थोटे/मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले.

पथकाने कुंताबाई मोहपत राऊत, रा. मुल्ला/हेटी यांच्या घरी भेट दिली असता, तेथे वन्यप्राणी रानडुकराचे शिजवलेले मांस जर्मनच्या गंजामध्ये आढळून आले. चौकशीदरम्यान कुंताबाई राऊत यांनी सदर मांस रवींद्र परसराम भुते व विजय कमल वाघाडे यांच्या घरीही असल्याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, रवींद्र भुते यांच्या घरी सुमारे एक किलो कच्चे मांस तर विजय वाघाडे यांच्या घरात चुलीवर सुमारे दीड किलो रानडुकराचे मांस शिजत असल्याचे आढळून आले.

या सर्व ठिकाणांहून मांस ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सखोल चौकशी केली असता, सदर मांस जितेंद्र पुंगडे, रा. बोरकन्हार, ता. आमगाव याने पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार देवरी व आमगाव वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे जितेंद्र पुंगडे याच्या घरी जाऊन चौकशी केली. पुढील तपासात विजय झिंगर मडावी व हेमराज कुंभरे या दोन आरोपींची नावे समोर आली.

या दोघांनी चौकशीदरम्यान शेतात विद्युत करंटच्या सहाय्याने रानडुकराची शिकार करून मांस विक्री केल्याची कबुली दिली. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारच्या शिकारीमुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात कुंताबाई मोहपत राऊत, रवींद्र परसराम भुते, विजय कमल वाघाडे (रा. मुल्ला/हेटी, ता. देवरी) तसेच जितेंद्र पुंगडे, विजय झिंगर मडावी, हेमराज कुंभरे (रा. बोरकन्हार, ता. आमगाव) अशा एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरोधात गुन्हा क्रमांक ०४२६३/०१/२०२६/१०६८१९ नुसार भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८ व ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान शिकारीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूच्या खोट्या, मटन कापण्यासाठी वापरलेले साहित्य, कुऱ्हाड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई पवनकुमार जाग उपवनरक्षक, सचिन डोंगरवार सहाय्यक वनरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणात काही आरोपी फरार असून, वापरलेले इतर साहित्य शोधण्याचे काम सुरू असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

रानडुकराची अवैध शिकार व मांस विक्री प्रकरणी सहा जण ताब्यात घेतल्याने जिल्ह्यातील वन्यजीव तस्करीविरोधात मोठा संदेश गेला असून, पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *