नवेगाव-नागझिरा बफर झोन विस्तारामुळे जांभळीवासीयांमध्ये वाढता संभ्रम

wartaa.in
Share on

नवेगाव-नागझिरा बफर झोन च्या अलीकडील विस्तारामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासीबहुल गावांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २६ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १२४१.२७३ चौरस किलोमीटर क्षेत्र नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर झोन म्हणून अधिकृतपणे अधिसूचित करण्यात आले आहे.

या निर्णयाचा मुख्य उद्देश नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे प्रभावी संवर्धन, संरक्षण आणि एकसंघ प्रशासकीय नियंत्रण प्रस्थापित करणे हा आहे. याआधी या क्षेत्रांवर उपवनसंरक्षक, गोंदिया व भंडारा तसेच वन विकास महामंडळ, भंडारा यांचे वेगवेगळे प्रशासकीय नियंत्रण होते. मात्र, आता हे संपूर्ण बफर क्षेत्र क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्या अधिसूचनेनुसार गोंदिया प्रादेशिक वन विभागातील ४१९.८९४ चौ.कि.मी., भंडारा प्रादेशिक वन विभागातील ६८.५६६ चौ.कि.मी., वन विकास महामंडळाकडील १३९.५१४ चौ.कि.मी., तसेच संरक्षित क्षेत्रात असून गाभा क्षेत्रात समाविष्ट नसलेले २०.७०४ चौ.कि.मी. क्षेत्र बफर झोन व्यवस्थापनात समाविष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी, दोडके व लोधीटोला या आदिवासी गावांच्या हद्दीत येणाऱ्या जंगलाचा मोठा भाग बफर झोनमध्ये समाविष्ट झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता दिसून येत आहे. नवेगाव-नागझिरा बफर झोन घोषित झाल्यानंतर आपल्या पारंपरिक उपजीविकेवर निर्बंध येतील का, हा प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहे.

या भागातील बहुसंख्य नागरिकांचे जीवनमान जंगलावर आधारित आहे. मोहफुल, तेंदूपत्ता, रानमेवा संकलन, पशुचारण, लाकूड गोळा करणे आणि इतर वनाधारित व्यवसाय हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहेत. मात्र, बफर झोन विस्तारामुळे घरगुती जलाऊ लाकूड बंद होणार, गाय-गुरे चराईवर निर्बंध येणार, मोहफुल व रानमेवा वेचण्यास मनाई होणार अशा अफवा पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

याशिवाय, जंगलालगत असलेल्या शेतीवर वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेती अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई होईल का, वीटभट्टी व्यवसाय बंद पडेल का, पशुचारणासाठी जंगलात प्रवेश रोखला जाईल का, यासारख्या अनेक शंका गावकऱ्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मौन बाळगल्याने अफवांना अधिकच खतपाणी मिळत आहे. गावनिहाय स्पष्ट नकाशे, बफर झोनचे अचूक क्षेत्रफळ आणि त्याचे परिणाम याबाबत प्रशासनाने तातडीने माहिती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच पारंपरिक उपजीविकेच्या संरक्षणाबाबत लेखी हमी देण्यात यावी, मानवी हक्क व वनहक्क कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या अधिकारांवर गदा येऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

या संदर्भात जांभळी (दोडके) येथील उपसरपंच विजयकुमार सोनवणे यांनी सांगितले की, “बफर झोनच्या नावाखाली जर आमच्या उपजीविकेवर गदा आली तर ते अन्यायकारक ठरेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींशी चर्चा करून विश्वासात घेणे गरजेचे आहे.”

नवेगाव-नागझिरा बफर झोन च्या विस्तारामुळे निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने स्थानिक पातळीवर संवाद साधावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *