नवेगावबांध येथील नौकाविहार तीन वर्षांपासून बंद : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटनाला फटका
नवेगावबांध येथील नौकाविहार गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक पर्यटन व्यवस्थेला मोठा फटका बसला असून, यामुळे लाखोंच्या महसुलावर पाणी फिरले आहे. विशेष म्हणजे, या नौकाविहारावर अवलंबून असलेले ११ प्रशिक्षित युवक बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विमा न भरल्यामुळे नौकाविहार बंद ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नवेगावबांध येथील सुप्रसिद्ध जलाशय हा गोंदिया जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, नवेगावबांध नौकाविहार बंद असल्यामुळे पर्यटकांना मोठी निराशा सहन करावी लागत आहे. अनेक पर्यटक केवळ नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी येथे येतात, पण प्रत्यक्षात नौका धुळखात पडलेल्या दिसतात.
देवेंद्र मेश्राम या नौकाचालक प्रशिक्षणप्राप्त युवकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, “माझ्यासह ११ युवकांनी नौकाविहाराचे अधिकृत प्रशिक्षण घेतले होते. या माध्यमातून आम्हाला रोजगार मिळत होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून विमाअभावी नौकाविहार बंद असल्याने आमचा रोजगार हिरावला गेला आहे.” त्यांनी वन समिती व वनविभागाने तातडीने दुर्घटना विमा भरून नौकाविहार सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
नवेगावबांध येथील जलाशयातील नौकाविहार संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वनविभाग (प्रादेशिक) यांच्या माध्यमातून चालवला जात होता. मात्र, मागील तीन वर्षांपासून समिती आणि वनविभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव उघडकीस आला आहे. या गोंधळाचा थेट फटका स्थानिक युवकांच्या रोजगाराला आणि पर्यटन महसुलाला बसला आहे.
माहितीनुसार, नौकाविहार बंद असल्यामुळे आतापर्यंत संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ४० ते ५० लाख रुपयांचा महसूल बुडाला आहे. याशिवाय, सुमारे १० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या नौका बेवारस अवस्थेत पडून असून काही नौका सडून निकामी झाल्या आहेत. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
महत्त्वाचे म्हणजे, मे २०२३ पासून संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन झालेले नाही. गावातील अंतर्गत राजकारण, अवैध समिती गठन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे समितीचा कारभार पूर्णपणे ठप्प झाला आहे. ग्रामसभेने अवैध समिती रद्द केली असतानाही शासन नियमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या सर्व गोंधळाचा परिणाम म्हणजे नौकाविहारासाठी आवश्यक असलेला अपघाती विमा काढलाच गेला नाही, आणि त्यामुळे नौकाविहार बंद ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी, पर्यटन संकुलातील इतर साहसी पर्यटन उपक्रमांवरही विपरीत परिणाम झाला आहे.
स्थानिक नागरिक, प्रशिक्षित युवक आणि पर्यटकांकडून आता एकच मागणी केली जात आहे—लोकप्रतिनिधी, वनविभाग आणि पाटबंधारे विभागाने पुढाकार घेऊन त्वरित नौकाविहार सुरू करावा. विशेषतः सध्या जलाशयाचे व्यवस्थापन पाटबंधारे विभागाकडे असल्याने त्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
नवेगावबांध येथील नौकाविहार सुरू न झाल्यास, भविष्यात येथील पर्यटन पूर्णतः कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन विमा प्रक्रिया पूर्ण करावी व प्रशिक्षित युवकांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

