पशुपक्षी प्रदर्शन पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीचा उपक्रमः जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर

wartaa.in
Share on

तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी नवे आशादायी पर्व घेऊन आला आहे. पशुपालन हा केवळ शेतीला पूरक व्यवसाय न राहता योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ घेतल्यास ग्रामीण कुटुंबांसाठी स्थिर व शाश्वत उत्पन्नाचे भक्कम साधन ठरू शकतो, असे ठाम मत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा आसोली / आमगाव येथे आयोजित तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. पशुपालन क्षेत्रातील बदलत्या संधी आणि आधुनिक दृष्टिकोन यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, पशु व कृषी विभाग सभापती दिपा चंद्रिकापुरे, अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, पंचायत समिती सभापती योगिता पुंड, जि. प. सदस्य उषा मेन्ढे, हनवंत वट्टी, छबुलाई उके, पंचायत समिती उपसभापती सुनंदा उके, सदस्य नोहरलाल चौधरी, शिलाताई ब्राम्हणकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थित होते.

आपल्या भाषणात जि. प. अध्यक्ष भेंडारकर यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत शेतीबरोबरच पशुपालनावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. पशुधनाची योग्य काळजी, वेळेवर लसीकरण, संतुलित आहार, स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, दुग्धव्यवसाय यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धती अवलंबल्यास कमी खर्चात अधिक नफा मिळवता येतो, असे त्यांनी सांगितले.

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन योजना, अनुदान, कर्जसुविधा, पशुधन विमा योजना यांची माहिती घेऊन त्याचा लाभ पशुपालकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील तरुणांनी पशुपालनाकडे व्यवसाय म्हणून पाहावे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जालिंदर तिटमे, सहायक आयुक्त विनोद कोटांगले, डॉ. कांतीलाल पटले, डॉ. अजिंक्य उरकुडे, सरीता भगत यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, सुधारित जाती, लसीकरण वेळापत्रक, चारा व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना यावर सविस्तर माहिती दिली.

तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनामध्ये देशी व संकरीत गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, विविध जातींचे कोंबडे तसेच इतर पशुपक्षी मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्यात आले होते. पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे सादरीकरण करून एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण केली. यामुळे नवोदित पशुपालकांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे तालुक्यातील पशुपालन व्यवसायाला नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *