तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. छाया बोरकर यांची निवड; नांदेडमध्ये ऐतिहासिक परिषद होणार

wartaa.in
Share on

तिसरे अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषद येत्या १८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात असलेल्या सुजातपूर येथील जेतवन बौद्धभूमी येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या ऐतिहासिक व राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या अध्यक्षपदी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील प्रख्यात साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ज्ञ प्रा. छाया तानबाजी बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषद ही केवळ धार्मिक परिषद नसून, बौद्ध धर्माच्या मानवतावादी विचारांचा प्रचार, सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि मानवी मूल्यांची जपणूक यासाठी सातत्याने कार्य करणारे राष्ट्रीय व्यासपीठ आहे. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत बौद्ध धम्माचे मूल्य पोहोचवणे, स्त्रीशक्तीला नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणणे आणि विवेकवादी समाज घडवणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश राहिला आहे.

प्रा. छाया बोरकर यांची अध्यक्षपदी निवड ही त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक योगदानाची पावती मानली जात आहे. बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार, सामाजिक समतेसाठी लढा, स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह आणि मानवी मूल्यांची रुजवणूक या क्षेत्रांत त्यांनी दीर्घकाळ कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच अखिल भारतीय स्तरावर ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

प्रा. छाया बोरकर या मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या संस्थापक असून, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शोषित, वंचित व महिलांसाठी कार्य केले आहे. शिक्षण, प्रशिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.

साहित्य क्षेत्रातही प्रा. छाया बोरकर यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या लेखणीतून समाजातील वास्तव, अन्याय, संघर्ष आणि मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत.
त्यांचे “पळसफुले” काव्यसंग्रह, “अडला हरी गाढवाचे पाय धरी”, “माणसाने खाल्ल्या मिठाला जागावं”, “शेर शिजला ईस्तो इजला”, “हिरवाई मनात जपताना” (चारोळी संग्रह), “रणरागिणी” कादंबरी, “शापित शृंखला” काव्यसंग्रह, “झाडीच्या झुरवा” काव्यसंग्रह, “जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे” आणि “हो, मी सावित्री बोलते” हे नाटक अशा अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत.

याशिवाय “जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे – विद्येचा थोर विधाता” हे पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर असून, वाचकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे.

आपल्या निवडीबद्दल प्रा. छाया बोरकर यांनी जेतवन संस्थेच्या संस्थापक, साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या मा. सावित्रीताई शेवाळकर तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ही परिषद बौद्ध धम्म विचारांच्या प्रसारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *