वरठी सनफ्लॅग कंपनी अपघात : 70 फूट उंचावरून पडून क्रेन ऑपरेटरचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे चार तास आंदोलन

wartaa.in
Share on

वरठी सनफ्लॅग कंपनी अपघात हा भंडारा जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेच्या गंभीर प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे. वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या एसएमएस (SMS) विभागात काम करत असताना 70 फूट उंचावरून खाली पडून क्रेन ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मारुती महादेव भिवगडे (वय 45, रा. पाचगाव, ता. मोहाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

नेहमीप्रमाणे मारुती भिवगडे हे सकाळी कामावर हजर झाले होते. क्रेन ऑपरेट करण्यासाठी ते पायऱ्यांद्वारे वर चढत असताना अचानक तोल जाऊन ते थेट खाली कोसळले. तब्बल 70 फूट उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. घटनेनंतर सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

मारुती भिवगडे हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना भिवगडे (गृहिणी), मुलगी सिमरन (18) व मुलगा सुमित (16) असा परिवार आहे. सुमित हा सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. पाचगाव येथे जवळपास एक एकर शेती असली तरी कुटुंबाचा मुख्य आधार मारुती भिवगडे यांचे मासिक वेतनच होते. अशा परिस्थितीत अचानक घडलेल्या या अपघाताने कुटुंब उघड्यावर पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

या दुर्घटनेनंतर सनफ्लॅग कंपनीने कामगार सुरक्षेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास पाचगाव व वरठी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी सनफ्लॅग कंपनीच्या मुख्य गेटसमोर मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन सुरू केले. तब्बल चार तास मृतदेह गेटसमोर ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी मृतकाच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदतकुटुंबातील दोन सदस्यांना नोकरी देण्याची मागणी लावून धरली.

या आंदोलनात पाचगावचे सरपंच संतूलाल गजभिये, उपसरपंच महेश कळंबे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. माहिती मिळताच तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद सभापती आनंद मलेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव कारेमोरे, माजी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक आदी नेते आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले व सनफ्लॅग व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील यांनी हस्तक्षेप करत सनफ्लॅग व्यवस्थापन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणली. चर्चेदरम्यान सनफ्लॅग व्यवस्थापनाकडून काही मागण्या मान्य करण्यात आल्या. यामध्ये मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, विविध शासकीय व औद्योगिक मार्गातून जवळपास 30 लाख रुपयांची आर्थिक मदत, मृतकाच्या मुलाला आयटीआय किंवा पॉलिटेक्निक शिक्षणासाठी मदत, तसेच तात्काळ 2 लाख रुपयांची सानुग्रह रक्कम देण्याचे लिखित आश्वासन सनफ्लॅग व्यवस्थापक रामचंद्र दळवी यांनी दिले.

या आश्वासनानंतर सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले व मृतदेह अंत्यविधीसाठी रवाना करण्यात आला. यावेळी साकोली एसडीपीओ शिवम विसापुरे, वरठी ठाणेदार निलेश गिरी यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *