महाराष्ट्राच्या शिक्षणाची धुरा बिहारींच्या हाती!

wartaa.in
Share on

छत्रपती संभाजीनगर – शिक्षण हे भाषेच्या माध्यमातून समजून घेण्याची प्रक्रिया आहे, पण छत्रपती संभाजीनगरमधील अनेक खासगी क्लासेसमध्ये ही प्रक्रिया आज अडथळ्यांत सापडली आहे. कारण या क्लासेसमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या हिंदी भाषिक शिक्षकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे मराठी विद्यार्थ्यांना शिकताना भाषेचा अडसर जाणवतोय.

मराठी मुलांवर हिंदी शिकवणीचं सावट
शहरातील विविध भागांमध्ये अनेक पालक आपली मुले खासगी शिकवणी वर्गांमध्ये पाठवत आहेत. पण या ठिकाणी मराठी ऐवजी हिंदीतून शिकवणारे शिक्षक वाढलेत. काही शिक्षकांना मराठी येतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घेण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा येतो आहे.

“सर काय बोलतात तेच समजत नाही” – विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
शाळांमध्ये शिक्षण मराठीतून होत असतानाही क्लासेसमध्ये हिंदीतूनच शिकवणूक दिली जाते. त्यामुळे मुलांना दोन वेगळ्या भाषांमध्ये समजून घेणं कठीण जातं. एका विद्यार्थिनीने सांगितलं, “सर हिंदीमध्येच शिकवतात, आम्ही विचारतो तेव्हा ‘समझा लोगे’ असं म्हणून टाळतात.”

गुणवत्तेवर परिणाम, पालक त्रस्त
क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता असली, तरी भाषेतील दरीमुळे त्यांचं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचत नाही, अशी पालकांची तक्रार आहे. “मुलाला क्लास लावला पण तोच म्हणतो शिकवणं समजत नाही. मग पैसे कशासाठी?” असं एका पालकाने सांगितलं.

क्लास संचालकांचं स्पष्टीकरण
क्लासेस चालवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, “उत्तर भारतातील शिक्षक कमी पगारात काम करतात. आमचं आर्थिक गणित बघावं लागतं.” पण या बचतीसाठी शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात घालणं कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होतो.

शासनाने लक्ष देणं गरजेचं
या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने नियमावली तयार करून, शिक्षकांची पात्रता आणि भाषिक समज तपासणं गरजेचं आहे. अन्यथा स्थानिक विद्यार्थ्यांचं शिक्षण प्रभावी न राहता, संख्यात्मक बनून राहील.

छत्रपती संभाजीनगरमधील काही नामांकित खासगी शिकवणी वर्गांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारहून आलेल्या ‘सिन्हा’, ‘गुप्ता’, ‘तिवारी’ अशा आडनाव असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या अध्यापन शैलीतील आत्मविश्वास, विषयावरील प्रभुत्व आणि परीक्षा-केंद्रित तयारी यामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्या वर्गांना पसंती देत आहेत.

विशेष म्हणजे या शिक्षकांचं सरासरी वार्षिक वेतन किमान ४० लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण क्षेत्रात खासगी शिकवणीसाठी एवढं मोठं आर्थिक बजेट ठरवलं जातं हे अनेकांना आश्चर्यजनक वाटत असलं, तरी वाढत्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेच्या नावाखाली पालक आणि संस्था दोघेही या खर्चासाठी तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *