महायुतीची रॅली ठरली चर्चेचा विषय
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. भंडारा या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या संचालक पदासाठी आज दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी कोर्टाच्या आदेशानुसार उर्वरित सहा जागांसाठी मतमोजणी पार पडली. विशेष म्हणजे सर्वच सहा जागांवर महायुतीच्या सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले.
या ऐतिहासिक विजयानंतर भंडारा शहरात जल्लोषात विजयी रॅली काढण्यात आली. ही रॅली पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथून सुरू होऊन भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपर्यंत निघाली. विजयी संचालकांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
या विजयाचे श्रेय अनेक राजकीय मार्गदर्शकांना आणि कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीला दिलं जात आहे. यानंतर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला. या ठिकाणी नव्या संचालकांचं – सुनिलभाऊ फुंडे, नाना पंचबुद्धे, योगेश हेडाऊ, प्रशांत पवार, तिराबाई तुमसरे, डॉ. श्रीकांत वैरागडे, चेतक डोंगरे, धर्मेंद्र बोरकर – यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे स्वागत करण्यात आलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याचबरोबर गोंदिया जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राजेंद्र जैन यांचंही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की, “मा. प्रफुलभाई पटेल, आमदार परीणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आमदार राजुभाऊ कोरेमोरे यांच्या मार्गदर्शनामुळे महायुतीला हा भक्कम विजय मिळाला.”
या निवडणुकीत तीनही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभ्या-आडव्या पातळीवर सहकार्य केल्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
पुढे भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. विलासभाऊ काटेखाये यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करण्यात आलं.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेली मान्यवरांची यादी देखील लक्षणीय होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, भाऊराव तुमसरे, आरजु मेश्राम, देवचंद ठाकरे, लोमेश वैद्य, योगेश सिंगनजुडे, हेमंत महाकाळकर, रजनिश बन्सोड, अॅड. नेहा शेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
मात्र, या सर्व जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे – या निवडणुकीतील अंतर्गत घडामोडी आणि गुप्त रणनीती काय होत्या? यावर अद्याप कुणीही उघड बोललेलं नाही.

