सरपंच हर्ष मोदीविरोधात ९ ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण
उपसरपंच रोशन शिवणकरांचा ठाम निर्धार
सौंदड (ता. अर्जुनी सडक) – भ्रष्टाचारी सरपंच हर्ष मोदी याने सौंदड ग्रामपंचायतीत विकास निधीच्या कोट्यवधी रुपयांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप उपसरपंच रोशन शामराव शिवणकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी, यासाठी उपसरपंच शिवणकर क्रांती दिन ९ ऑगस्ट २०२५ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करत आहेत.
उपसरपंचांनी केलेल्या खुलास्यानुसार, ग्रामपंचायतीच्या निधीचा अपारदर्शक व मनमानी पद्धतीने वापर करण्यात आला आहे. सरपंच हर्ष मोदी यांनी विकासकामांमध्ये कोणतीही पारदर्शकता ठेवलेली नाही. ग्रामस्थांच्या उपस्थितीत जबाबदारी स्वीकारण्याऐवजी, त्यांनी राजकीय वरदहस्ताचा आधार घेत आपल्यावरील आरोप टाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, नुकतीच चौकशी समिती सौंदड ग्रामपंचायतीमध्ये आली असता, ग्रामपंचायत अधिकारी अचानक रजा घेऊन अनुपस्थित राहिला, ज्यामुळे चौकशीला विलंब झाला. यामागे सरळ सरळ कुटिल हेतू असल्याचा संशय शिवणकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवणकर यांच्या म्हणण्यानुसार, “१०० टक्के भ्रष्टाचार हर्ष मोदीनेच केला आहे. जनतेलाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र आता प्रसिद्धीसाठी व सहानुभूती मिळवण्यासाठी, या भ्रष्टाचाऱ्याने पत्रकार परिषद घेत, खोटे आरोप करत स्वत:ची प्रतिमा सुधारणाचा प्रयत्न केला. एवढंच नाही, तर आता तो म्हणतोय की जर काही चुकीचं झालं असेल, तर त्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी जबाबदार आहे!”
यावर शिवणकर म्हणतात की, “जर अधिकारीच जबाबदार असेल, तर सरपंच म्हणून त्याने गैरव्यवहार थांबवायला हवा होता. पण खरंतर सरपंच आणि अधिकारी यांचं संगनमत असून, माझ्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी उपोषणादरम्यान जनतेसमोर ठेवणार आहे.”
उपोषणाच्या दिवशी हर्ष मोदीच्या भ्रष्टाचारात मदत करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते कोण होते, याचीही यादी आणि पुरावे सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या लढ्यात सहभागी होऊन भ्रष्टाचाराचे खरे चेहरे उघड पाडावेत, असे आवाहन उपसरपंचांनी केलं आहे.
शेवटी, रोशन शिवणकर यांनी ठामपणे सांगितले – “ज्या दिवशी चौकशी अहवालात हर्ष मोदीचा भ्रष्टाचार सिद्ध होईल, त्याच दिवशी त्याने राजीनामा द्यावा. अन्यथा गावकरी एकत्र येऊन दबाव निर्माण करतील. कारण सत्यचाच विजय होणार आहे.”

