मोठे होण्यासाठी उंच स्वप्न पाहा – आमदार राजकुमार बडोले

wartaa.in
Share on

अर्जुनी/मोर प्रतिनिधी) –
मोठे होण्यासाठी उंच स्वप्न पाहा, अशी प्रेरणादायी हाक अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी मोरगाव येथे दिली. “जीवनात मोठे व्हायचे असेल तर लहान विचार करून चालत नाही. उंच स्वप्न पाहा, मोठे ध्येय ठेवा आणि त्या दिशेने अविरत प्रयत्न करा,” असे ते म्हणाले.

मोरगाव येथे नुकत्याच झालेल्या नूतन महसूल अधिकारी कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार बडोले उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी आकस्मिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय परिसर, पायाभूत सुविधा आणि शिक्षणाचे वातावरण पाहून आमदारांनी समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार बडोले म्हणाले, “फक्त अभ्यासापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता क्रीडा, कला आणि सामाजिक कार्यातही मुलांनी सहभाग घ्यावा. परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी या तीन गोष्टी जीवनात यशाचे खरे सूत्र आहेत. गावागावातील मुलांनी उंच स्वप्ने पाहून देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.”

शाळेतील सहाय्यक शिक्षिका रूपाली मेश्राम यांनी अलीकडेच इंग्रजी विषयातील SET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याबद्दल आमदार राजकुमार बडोले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.

या सोहळ्यात अर्जुनी/मोर पंचायत समितीच्या सभापती आम्रपालीताई डोंगरवार, उपविभागीय अधिकारी वरूनकुमार सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सरपंच गीताताई नेवारे, जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते, अभियंता यशवंत गणवीर, माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, लोकपाल गहाणे, प्रदीप मस्के, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वेंकट खोब्रागडे, लैलेश्वर शिवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी लोधी, महाराष्ट्र का मानबिंदूचे संपादक सुशील लाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे, पोलीस पाटील रमेश झोडे, विद्या शहारे, प्रमिला शहारे यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाने गावातील विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. आमदार बडोले यांनी दिलेला संदेश – “मोठे होण्यासाठी उंच स्वप्न पाहा” – हे वाक्य ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मनावर गारुड करून गेले. त्यांच्या या विचारांमुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर गावातील प्रत्येक तरुणाला स्वतःसाठी मोठे ध्येय ठेवण्याची ऊर्जा मिळाली.

शिक्षणासोबत क्रीडा, कला, सामाजिक जबाबदारी आणि चिकाटीचा संगम झाल्यासच समाज आणि राष्ट्र प्रगती करेल, असा ठाम विश्वास आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. यामुळे मोरगावच्या शाळेतील हा क्षण गावाच्या इतिहासात प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *