मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गाढवी नदीपात्रात बंधारा : केशोरी/कनेरी गावाच्या जलभविष्याला नवे वळण!
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गाढवी नदीपात्रात बंधारा निर्मिती हा उपक्रम केशोरी/कनेरी ग्रामपंचायतीसाठी एक मैलाचा दगड ठरत आहे. राष्ट्रीय पंचायतराज अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून आणि लोकसहभागाच्या जोरावर गाढवी नदीपात्रात एका लहान पण अत्यंत उपयुक्त बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. हा उपक्रम दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
अर्जुनी-मोर तालुक्यातील केशोरी/कनेरी गावाने जलसंधारणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी गावातील उमेद गटातील सदस्य, विविध महिला बचत गटांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. कोणत्याही मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा लोकसहभाग आणि सामूहिक इच्छाशक्तीच्या बळावर हे काम पूर्ण झाले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
गाढवी नदी ही परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, पावसाळ्यानंतर काही महिन्यांतच नदीपात्र कोरडे पडत असल्याने गावाला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गाढवी नदीपात्रात बंधारा निर्मिती झाल्यामुळे आता पाणी अधिक काळ साठून राहणार असून, भूजल पातळी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
या बंधाऱ्यामुळे केवळ शेतीसाठीच नव्हे तर ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांसाठीही पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. विशेष म्हणजे, या नदीपात्राच्या परिसरात दहनविधी केला जातो. दहनानंतर प्रेत विजवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. याआधी पाण्याअभावी अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आता बंधाऱ्यामुळे २४ तास पाण्याची उपलब्धता राहणार असल्याने धार्मिक, सामाजिक आणि मानवी गरजांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
हा उपक्रम लोकसहभागातून विकास कसा साधता येतो याचे जिवंत उदाहरण ठरत आहे. जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकास यांचा त्रिसूत्री संगम या बंधाऱ्यातून दिसून येतो. भविष्यात या पाण्याचा वापर शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन तसेच वृक्षलागवडीसाठीही करता येईल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
बंधारा निर्मितीच्या वेळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच नंदकुमार पाटील गहाणे, उपसरपंच रामुजी बनकर, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य श्रीरामजी शेंडे, धनपाल समरीत, अरुण मस्के, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनिल लाडे, एकनाथ राणे, ग्रामविकास अधिकारी नगराळे, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणारे असे उपक्रम ग्रामीण महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठी आशादायी ठरत असून, केशोरी/कनेरी येथील गाढवी नदीपात्रातील बंधारा भविष्यात अनेक गावांसाठी प्रेरणास्थान ठरेल, यात शंका नाही.

