आमगाव अवैध मुरूम खनन उघडकीस : पोलिसांची अचानक कारवाई, जेसीबीसह पाच ट्रॅक्टर ताब्यात
आमगाव अवैध मुरूम खनन प्रकरणी आमगाव पोलिसांनी केलेली कारवाई सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. गौण खनिज असलेल्या मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करून त्याची सर्रास वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी थेट घटनास्थळी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच ट्रॅक्टर, एक जेसीबी मशीन आणि ट्रॉलीसह सुमारे ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सितेपार शिवारातील नवातलावजवळील पहाडी परिसरात रविवारी (दि. ४) दुपारी सुमारे १२.५० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी पहाड पोखरून मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
कारवाईपूर्वी गावातील दोन पंचांना विश्वासात घेऊन त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने थेट घटनास्थळी धडक दिली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना पहाडीच्या पायथ्याशी पिवळ्या रंगाच्या जेसीबी मशीनद्वारे उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. उत्खनन केलेला मुरूम हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत भरला जात होता, तर जवळच एका मागे एक असे चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभे होते.
पोलिसांनी संबंधित चालक व मजुरांकडे चौकशी केली असता, खनन व वाहतुकीसाठी शासनाकडून कोणताही वैध परवाना अथवा रॉयल्टी पास नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हे संपूर्ण उत्खनन बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक जेसीबी मशीन व पाच ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी आकाश रामदास डोये (२२, रा. मोरवाही), विजय खेमचंद पाथोडे (२५, रा. सितेपार), राकेश सरजलाल राखडे (२८, रा. करंजी), भास्कर हरिराम बिसेन (२९, रा. सितेपार), पंकज घनश्याम बिसेन (२७, रा. सितेपार) आणि संदीप रतिराम हत्तीमारे (३१, रा. कार्तुली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विना क्रमांकाचे चार ट्रॅक्टर (अंदाजे किंमत २४ लाख रुपये), विविध क्रमांकांच्या ट्रॉली (एकूण किंमत ८ लाख रुपये), ट्रॅक्टर क्रमांक MH 35 AG 5447 (अंदाजे किंमत १० लाख रुपये), विना क्रमांकाची ट्रॉली (२ लाख रुपये) तसेच जेसीबी मशीन (२० लाख रुपये) असा एकूण ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
या सहा आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम ३०३ (२), ६२, ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देवीदास ठमके करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धाडीत पोनि. तिरुपती राणे, पोउपनि. ठमके, हवालदार मेश्राम, चौधरी, पंधरे, असीम मन्यार, शिपाई चेतन शेंडे, भागवत कोडापे, गिरीया व चालक शिपाई इंगळे यांचा सहभाग होता.
या कारवाईमुळे आमगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम खनन व्यवसायावर मोठा आघात बसला असून, भविष्यात अशा कारवाया आणखी तीव्र होतील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

