रेबीजचा वाढता धोका लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय; खमारी येथे 36 वन कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात रेबीज लसीकरण

wartaa.in
Share on

प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे पहिल्या टप्यात 36 वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी दिली आहे.

गोंदिया, दि. 08 – रात्रंदिवस जंगलात गस्त घालणे, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच जंगलालगतच्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना अनेक जोखमींचा सामना करावा लागतो. विशेषतः कुत्रे, कोल्हे, वटवाघुळे, माकडे तसेच कधीकधी इतर वन्यप्राण्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक असते. या प्राण्यांमुळे रेबीजसारखा प्राणघातक आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य विभाग व वन विभागाच्या संयुक्त पुढाकारातून वन कर्मचाऱ्यांसाठी रेबीज लसीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे, लसीकरणाचा निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा गोंदिया जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दि. 19 डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे 36 वन कर्मचाऱ्यांना रेबीज लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

रेबीज हा एक अत्यंत धोकादायक विषाणूजन्य आजार असून, लक्षणे दिसू लागल्यानंतर जवळजवळ १०० टक्के प्राणघातक ठरतो. मानवामधील रेबीजचा उष्मायन कालावधी साधारणतः १ ते ३ महिने असतो. मात्र काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये हा कालावधी काही दिवसांपासून ते वर्षानुवर्षे, अगदी ६ ते ८ वर्षांपर्यंतही असू शकतो. एकदा लक्षणे दिसू लागल्यानंतर कोणताही ठोस उपचार उपलब्ध नसल्याने लसीकरण हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे.

या पार्श्वभूमीवर, संशयित प्राण्याच्या चाव्याची वाट न पाहता त्वरित वैद्यकीय मदत घेणे आणि पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) उपचार सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गोल्हार यांनी स्पष्ट केले. तसेच, उच्च धोका असलेल्या वन कर्मचाऱ्यांसाठी प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ही मोहीम जिल्हाधिकारी प्रजित नायरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली असून, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

लसीकरण प्रक्रिया ओपीडी आरोग्य सेविका माधुरी टेंभुरकर, सूर्यकांता मडावी, आरोग्य सहायिका ललिता पटले व आरोग्य सहायक गजेंद्र तावाडे यांच्या सहकार्याने पार पडली.

या कार्यक्रमाला नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सामाजिक वनीकरण विभागाचे तुषार ढमढेरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन मेश्राम यांच्यासह वन व आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भविष्यात टप्प्याटप्प्याने गोंदिया जिल्ह्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांना रेबीज लसीकरण करण्यात येणार असून, हा उपक्रम त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *