गोंदिया तालुक्यातील जंगीटोला शिवारात थरारक घटना : लोंबकळत्या वीजतारांचा स्पर्श, तणसाने भरलेला ट्रॅक्टर जळून खाक
गोंदिया तालुक्यातील जंगीटोला शिवारात वीजतारांचा स्पर्श होऊन ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवार, ८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारात घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रॅक्टर मालक आणि संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना कामठा–घाटेमणी मार्गावरील जंगीटोला शिवारात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शेतकरी सुभाष फरकुंडे यांच्या शेतातील तणस घेऊन ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एडब्ल्यू ९७६७ हा कामठा येथून घाटेमणीच्या दिशेने जात होता. ट्रॅक्टरवर मोठ्या प्रमाणात तणस लोड करण्यात आले होते. दुपारच्या सुमारात ट्रॅक्टर जंगीटोला शिवारात पोहोचताच रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबांवरील लोंबकळणाऱ्या जीवंत वीजतारांचा तणसांना स्पर्श झाला.
तणस हा कोरडा असल्याने काही क्षणांतच आगीने भडका उडाला. चालकाच्या लक्षात येण्याआधीच आगीने तणस व्यापला आणि आगीने ट्रॅक्टरलाही वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच संपूर्ण ट्रॅक्टर आणि त्यावर लोड असलेला तणस जळून भस्मसात झाला. घटनेदरम्यान ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र तोपर्यंत ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झाला होता. या आगीत ट्रॅक्टर मालक रूपलाल पटले यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी सुभाष फरकुंडे यांचाही तणस जळाल्याने आर्थिक फटका बसला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजतारा अनेक दिवसांपासून लोंबकळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, कामठा–घाटेमणी मार्गावरून दररोज अनेक शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतीमालाची वाहतूक करतात. अशा परिस्थितीत लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन वीजतारा दुरुस्त कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित प्रशासन आणि वीज वितरण कंपनीला देण्यात आली असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. नुकसानग्रस्त शेतकरी व ट्रॅक्टर मालकाला तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

