गोंदिया पोलिसांचा मोठा कारनामा : हरविलेले ३८९ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या चेहऱ्यावर आणले हास्य

wartaa.in
Share on

गोंदिया पोलिस दलाने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी उल्लेखनीय कामगिरी करत हरविलेले तब्बल ३८९ मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांना परत केले आहेत. अंदाजे ५३ लाख रुपये किमतीचे हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने जिल्ह्यात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी पोलिस वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात आल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि सायबर सेलच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी एकत्रितपणे हरविलेल्या मोबाईलचा शोध मोहिमेअंतर्गत तपास सुरू केला होता. नागरिकांनी यापूर्वी नोंदवलेल्या तक्रारींचा सखोल अभ्यास करून तांत्रिक विश्लेषण, IMEI ट्रॅकिंग आणि सायबर तपासाच्या माध्यमातून ही व्यापक कारवाई यशस्वी करण्यात आली.

मोबाईल हरविल्यानंतर परत मिळेल, अशी अपेक्षा सोडून दिलेल्या अनेक नागरिकांना जेव्हा पोलिसांकडून फोन आला, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी गोंदिया पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि प्रामाणिक सेवेचे मनापासून कौतुक केले.

आकडेवारीनुसार,

  • गोंदिया उपविभाग अंतर्गत एकूण २२६ मोबाईल फोन (अंदाजे किंमत २९ लाख रुपये) परत करण्यात आले.
  • तिरोडा उपविभागीय पोलिस कार्यालय येथे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या हस्ते ४९ मोबाईल फोन (किंमत सुमारे ७ लाख रुपये) मूळ मालकांना देण्यात आले.
  • तसेच देवरी उपविभागीय पोलिस कार्यालय येथे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या हस्ते ११४ मोबाईल फोन (किंमत अंदाजे १७ लाख रुपये) नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.

अशा प्रकारे एकूण ३८९ हरविलेले मोबाईल फोन, ५३ लाख रुपये किमतीचे, अधिकृत कार्यक्रमात नागरिकांना परत देण्यात आले. हा कार्यक्रम केवळ मोबाईल परत देण्यापुरता मर्यादित न राहता, पोलिस आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरला.

सध्या मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आर्थिक व्यवहार, वैयक्तिक माहिती, कागदपत्रे आणि आठवणी साठवलेला मोबाईल हरवणे म्हणजे मोठे नुकसान. अशा परिस्थितीत गोंदिया पोलिसांनी हरविलेले मोबाईल शोधून काढणे ही नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.

या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून, सायबर गुन्हे नियंत्रणात पोलीस किती सक्षम आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गोंदिया पोलिसांची ही कामगिरी इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *