न्याय तुमच्या दारी : गोंदियात भव्य विधी सेवा महाशिबिर, शेवटच्या नागरिकांपर्यंत न्याय पोहोचवण्याचा संकल्प

wartaa.in
Share on

न्याय तुमच्या दारी या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आज गोंदिया येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महाशिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळवून देणे, असा ठाम संदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती किलोर म्हणाले की, “संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. मात्र, ज्ञानाच्या अभावामुळे अनेक गरजू नागरिक या अधिकारांपासून वंचित राहतात. अशा वेळी ‘न्याय तुमच्या दारी’सारखे विधी सेवा महाशिबिर हे न्यायप्रक्रियेचे लोकशाहीकरण करणारे प्रभावी माध्यम ठरते.”

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, जिल्हा न्यायालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाशिबिरात शासनाच्या विविध विभागांचे तब्बल 40 स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यामधून नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शनासह विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती न्यायिक एम. डब्ल्यू. चांदवाणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेश वाळके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. टी. बी. कटरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यायमूर्ती किलोर यांनी न्यायाधीश व सामान्य नागरिकांमधील अंतर कमी करण्यासाठी अशा महाशिबिरांची गरज अधोरेखित केली. विशेष बाब म्हणजे, या कार्यक्रमात सहभागी न्यायाधीशांनी साध्या वेशात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. यामुळे न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यायदूत योजना’ या उपक्रमाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, वकिलांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून एका गावात घेतलेल्या शिबिराचा लाभ आजूबाजूच्या दहा गावांपर्यंत पोहोचतो. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे गावपातळीवरच अनेक समस्या मार्गी लागत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे विधी सेवा महाशिबिर जिल्ह्यातील लहान गावांमध्येही आयोजित करावेत, अशी सूचना त्यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्यातील न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी संघटनेने मासिक निधीतून गरजू नागरिकांना मदत करून समाजोपयोगी आदर्श उपक्रम राबवल्याबद्दल न्यायमूर्ती किलोर यांनी विशेष कौतुक केले. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सालेकसा तालुक्यातील न्यायालयाच्या भूमी अधिग्रहणाच्या कामाला गती मिळणार असून गोरेगाव येथे नवीन न्यायालय उभारणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली. पालक न्यायमूर्ती चांदवाणी यांनीही या प्रस्तावांचा पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या महाशिबिराचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे. योग्य कागदपत्रांच्या आधारे नागरिक खाजगी रुग्णालयातील राखीव बेड्ससारख्या सुविधांचाही लाभ घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नरेश वाळके यांनी केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. एकूणच, ‘न्याय तुमच्या दारी’ हे विधी सेवा महाशिबिर गोंदियासाठी न्याय व विकासाचा नवा अध्याय ठरले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *