तुकाराम मुंढेंच्या एफडीएतील कारवाईचे FSSAI कडून कौतुक
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आय. ए. एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम उघडली आहे. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने हजारो तपासण्या करून शेकडो आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यांच्या या धडक कारवाईचे आता देशाच्या सर्वोच्च अन्न नियामक संस्थेकडून कौतुक करण्यात आले असून ‘फूड सेफ्टी’ विभागातील बदली ही ‘पनिशमेंट पोस्टिंग’ नसते, असा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे (FSSAI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रजित पुन्हानी यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांच्या धोरणांचे जोरदार समर्थन केले. इच्छा तिथे मार्ग असतो हेच तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे, अशा शब्दांत पुन्हानी यांनी मुंढेंच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.

