गोंदियातील कालीमाती येथे २५ व २६ सप्टेंबरला महापरिनिर्वाणपाठ व धम्मदीक्षा सोहळा
स्थान: अर्जुनी/मोर.जि.गोदिया
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कालीमाती येथे वर्षावास भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आगामी २५ व २५ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य महापरिनिर्वाणपाठ व धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विविध ठिकाणांहून पूज्य भिक्खू संघाचे या ठिकाणी आगमन होणार आहे. भगवान गौतम बुद्धांचे प्रज्ञा आणि करुणेचे विचार, धम्माचे मूलतत्त्वज्ञान, तसेच समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान धम्मपाठ, धम्मदेशना, भोजनदान, धम्मध्वजारोहण, अष्टपरिष्कार दान यांसारखे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यासाठी नागपूर, भंडारा, उत्तराखंड यांसह विविध भागांतून पूज्य भिक्खू संघाचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नेलगाव येथील पूज्य भिक्खू देवानंद, उत्तराखंडवरून दर्शनिय स्थविर, सावंगी येथील महामंगल थेरो, भंडारा येथील शिलारक्षित, कालीमातीचे नंद स्थविर, आलेबेदर येथील नागमुनी आणि कालीमातीचेच श्रमण सिद्धार्थबोधी यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या पत्रिकेत नमूद करण्यात आली आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचे वेळापत्रक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आखण्यात आले आहे. आगामी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात होईल. त्यानंतर रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी भोजनदान कार्यक्रम पार पडेल. रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पूज्य भिक्खू संघाचे स्वागत आणि त्यानंतर धम्मदेशनेचा कार्यक्रम होईल. रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून प्रत्यक्ष महापरिनिर्वाणपाठास सुरुवात होईल, जो संपूर्ण रात्री चालणार आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी महापरिनिर्वाणपाठाचा समारोप केला जाईल. त्यानंतर पूज्य भिक्खू संघाच्या हस्ते व उपस्थितीत अत्यंत उत्साहात धम्मध्वजारोहण संपन्न होईल. सकाळी ७ वाजता भिक्खू संघाला अष्टपरिष्कार दान अर्पण केले जाईल, त्यानंतर सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची सोय असेल. सकाळी ९ वाजता पुन्हा एकदा पूज्य भिक्खूंची धम्मदेशना होईल आणि सकाळी ११ वाजता भिक्खू संघाचे भोजनदान झाल्यानंतर उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाचा कार्यक्रम पार पडेल. या संपूर्ण आयोजनामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा संदेश समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी आपली बुद्धी, कौशल्य, वेळ आणि स्वतःचा आर्थिक व मानसिक सहभाग देऊन कार्य करणाऱ्या निष्ठावान व्यक्तींची आणि कार्यकर्त्यांची समाजात आवश्यकता आहे, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम महाराजा धम्मकानन अनागारिक कल्याणकारी संस्था, कालीमाती तथा अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय सोहळ्यात तालुक्यातील समस्त बौद्ध समाज, उपासक, उपासिका तसेच सर्वधर्मसमभावी धम्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांच्या प्रवासासाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कालीमाती हे ठिकाण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नेवागावबांध राज्या अंतर्गत येते. प्रवाशांच्या सोयीसाठी अर्जुनी बसस्थानकावरून कालीमाती ते प्रतापगड मार्गासाठी नियमित बस सेवा उपलब्ध असल्याची माहिती पत्रिकेत देण्यात आली आहे. या पवित्र धम्म सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व उपासक आणि उपासिकांनी कार्यक्रमाची गरिमा आणि पावित्र्य लक्षात घेऊन शक्यतो पांढरे वस्त्र धारण करूनच उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. भगवान बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आणि समाजात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी अशा प्रकारच्या धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज बनले आहे, असा सूर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उमटत असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये या सोहळ्याबद्दल कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

