अवैध रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई; प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड वसूल. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचा दणका :

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई; प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड वसूल. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचा दणका :
Share on

वार्ताहर : अजय शहारे | सडक अर्जुनी

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई; प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड वसूल.
तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचा दणका : सडक अर्जुनी, कोहमारा व केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम.

सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात अवैध गौण खनिजाच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑक्टोबर रोजी महसूल विभागाच्या पथकाने सडक अर्जुनी येथील शिवमंदिर परिसरातून ५, कोहमारा येथून ३ आणि केसलवाडा येथून ५ अशा एकूण १३ बैलबंड्यांवर धडक कारवाई केली. या सर्व १३ बैलबंड्या जप्त करून सडक अर्जुनी तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या होत्या. ही कारवाई तलाठी मयूर थोरवे, हनुमंत आंबेकर, विकी पवनकर आणि सूरज नागरे यांच्या पथकाने पार पाडली.

विशेष म्हणजे, या व्यावसायिक बैलबंड्यांना ट्रॅक्टरची मोठी चाके बसवण्यात आली आहेत; ज्यामुळे नदीपात्रातील रेतीमध्ये ही चाके रुतून बसत नाहीत आणि बैलांनाही अधिक वजनाची रेती ओढून नेणे सोपे जाते. या माध्यमातून रेतीची अवैध वाहतूक करणारे व्यावसायिक नदीतून रेतीचा उपसा करून ती ट्रकधारकांना चढ्या भावाने विकत असल्याचे समोर आले आहे.

अवैधरीत्या रेतीची चोरी करून व्यावसायिक विक्री करणाऱ्या चालक व मालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ अन्वये ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये नरेश चांदेवार, भूपेश टेकाम, बबलु ठाकूर, गोविंद नान्हे, राजकुमार पात्रे, भारत जनबंधू, विलास बडोळे, जनार्दन जनबंधू, सुरेश खोटले, सुनील तरोने, गोलु कोरे, रोहित ब्राम्हणकर आणि बबलु कोरे यांचा समावेश आहे. संबंधित वाहनांकडून प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला असून, २९ ऑक्टोबर रोजी सर्व वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरून आपली वाहने परत नेली.

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, राका, पळसगाव, चिखली, घाटबोरी कोहळी, घाटबोरी तेली, वडेगाव, सावंगी, बामणी, बामणी खडकी, सेंडा यांसह अनेक गावांतील नदीपात्रातून व्यावसायिक बैलगाडीधारक विनापरवाना रेती उपसा करत असल्याचे चित्र असून, महसूल विभागाने या भागांतही कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, एप्रिल २०२६ पासून अवैध रेती वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाया करण्यात येत असून, तहसील आवारात अनेक ट्रॅक्टर व ट्रक जप्त असल्याचे सांगत, गौण खनिजाची अवैध वाहतूक आढळल्यास थेट जप्तीची कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *