भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; टँकर चालक पसार
गोंदिया जिल्ह्यातील देवरी-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात साखरीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चौकातील चौरस्त्यावर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेल भरलेला टँकर (क्रमांक ए.पी.०२ टी.सी. २५१३) देवरीहून गोंदियाकडे भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी दागोजी बहेकार हे आपल्या दुचाकीने (क्रमांक ३५ ए.एफ. ८३५८) सातगाव सालेकसा मार्गाने जात होते. चौक ओलांडताना टँकरने निष्काळजीपणे चालवत त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दागोजी बहेकार यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांचे दोन्ही पाय तुटून वेगळे झाले. ही दृश्यं पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल अशी होती. अपघातानंतर टँकर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण बुराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

