पंचायत समिती अर्जुनी-मोरची वार्षिक आमसभा
पंचायत समिती अर्जुनी-मोरची वार्षिक आमसभा व सरपंच सम्मेलन आमदार तथा माजी मंत्री इंजी. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत उत्साहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत तालुक्यातील ग्रामीण विकास, रखडलेले प्रकल्प, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीच्या सुरुवातीला तालुक्यातील विविध प्रलंबित योजनांची माहिती सादर करण्यात आली. विशेषतः रस्त्यांची अडचण, घरकुल योजनेतील लाभार्थी सर्च संबंधित समस्या, पाणीटंचाई, जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था यांसारख्या मुद्द्यांवर सर्व सरपंचांनी चिंता व्यक्त केली. मनरेगा अंतर्गत पांदन रस्ते, गावांमध्ये सुसज्ज वर्गखोलीची गरज, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, जिल्हा वार्षिक योजनेतील निधीची मागणी हे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले.
धरणातील गाळ काढण्याची तातडीची गरज, तसेच बंधाऱ्यांच्या कामांबाबतही सविस्तर चर्चा झाली. आमदार बडोले यांनी याबाबत संबंधित विभागांना त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “विकासकामे थांबू नयेत, प्रत्येक योजना वेळेत मार्गी लागली पाहिजे, हीच आमची प्राथमिकता आहे.”
या बैठकीस अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, उपसभापती संदिपजी कापगते, जि.प. सदस्य यशवंतजी गणवीर, रचनाताई गहाणे, जयश्रीताई देशमुख, श्रीकांतजी घाटबांधे, गटविकास अधिकारी पल्लवी धनविजय, सहगटविकास अधिकारी श्री. राणे यांचा समावेश होता.
तसेच पंचायत समिती सदस्य — होमराजजी पुस्तोडे, नुतनलालजी सोनवाणे, डॉ. नाजुकजी कुंभरे, घनशामजी धामट, फुलचंदजी बागडेरीया, प्रमोदजी लांडगे, सविताताई कोडापे, पुष्पलताताई दृगकर, चंद्रकलाताई ठवरे, कुंदाताई लोगडे, शालिनीताई डोंगरवार, भाग्यश्रीताई आत्राम — यांनीही विविध विषयांवर आपले मत मांडले. सर्व शासकीय विभागप्रमुख, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
बैठकीत ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी स्पष्ट आराखडा तयार करण्यात आला. प्रलंबित योजनांना निधी उपलब्ध करून देणे, मंजूर प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी, तसेच लोकसहभागातून विकासकामांना गती देण्याचे ठरले.
आमदार बडोले यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, “प्रशासन आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नातून तालुक्याचा विकास हा आपला एकमेव उद्देश आहे. या बैठकीत मांडलेले मुद्दे केवळ कागदावर राहणार नाहीत, तर त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल.”
बैठकीच्या अखेरीस, सर्व सरपंचांनी तालुक्यातील समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत, प्रशासनाशी समन्वय साधून विकासाचे काम वेगात करण्याचे ठरविले. ही आमसभा तालुक्यातील विकास आराखड्याला नव्या दिशेने नेणारी ठरली, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

