पंचशील धम्म ध्वज यात्रेचे आयोजन
अर्जुनी मोरगाव येथे लवकरच पंचशील धम्म ध्वज यात्रेचे आयोजन होणार असून, या यात्रेतून बौद्ध समाज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जोरदार पाठिंबा देणार आहे. बिहारमधील गया जिल्ह्यातील प्राचीन आणि पवित्र महाबोधी महाविहार आजही प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आहे. हे स्थळ संपूर्णतः बुद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी अनेक दशकांपासून होत आहे. या मागणीसाठी शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी अर्जुनी मोरगाव नगरीत धम्म ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही भव्य यात्रा दुर्गा चौक येथून सुरू होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत नेण्यात येईल. हजारो अनुयायी पंचशील धम्म ध्वज हातात घेऊन ‘महाबोधी महाविहार हा संपूर्णतः बुद्धांच्या ताब्यात द्या’ असा एकमुखी जयघोष करतील. बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा संदेशही या यात्रेतून दिला जाणार आहे.
मे महिन्यातील महत्त्वपूर्ण भेट
या आंदोलनाला आणखी बळ देण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी मे महिन्यात आपल्या समर्थकांसह बौद्ध गया येथील महाबोधी महाविहारला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी पवित्र स्थळाचे दर्शन घेतले आणि ठाम भूमिका व्यक्त केली की, महाबोधी महाविहार हे बुद्ध अनुयायांच्या अखंड ताब्यात असले पाहिजे. यासंदर्भात त्यांनी बिहार येथील कलेक्टर यांना निवेदन सादर केले आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती.
आंदोलनाला नवा उर्जा स्त्रोत
आगामी धम्म ध्वज यात्रेमुळे स्थानिक पातळीवर मोठी चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळेल, अशी तयारी सुरू आहे. विविध सामाजिक संघटनाही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
सामाजिक समतेचा संदेश
धम्म ध्वज यात्रेतून केवळ महाबोधी मुक्ती आंदोलनालाच पाठिंबा मिळणार नाही, तर समता, करुणा आणि बंधुता यांचा संदेशही दिला जाईल. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारे समाजातील अन्याय, असमानता आणि अंधश्रद्धा दूर करण्याची भूमिका या यात्रेतून स्पष्ट होईल.
पुढील दिशा
बौद्ध अनुयायांची अपेक्षा आहे की केंद्र आणि राज्य सरकारने हा प्रश्न सकारात्मकतेने सोडवावा. अन्यथा देशभरात अशाच धम्म ध्वज यात्रांच्या माध्यमातून व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
अर्जुनी मोरगावात होणाऱ्या या यात्रेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमामुळे महाबोधी महाविहार प्रश्नाला नवी दिशा मिळेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

