भोंडेकरांचा स्फोटक आरोप : “फुके यांच्या राजकीय डावपेचामुळे भंडाऱ्यात भाजपचा शून्य झाला!”

wartaa.in
Share on

भंडारा (प्रतिनिधी) –
राजकारणात नात्यांपेक्षा डावपेच अधिक महत्त्वाचे असतात, पण कधी कधी हेच डावपेच पक्षाच्या मुळावर उठतात, असा टोला भंडाऱ्याचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे परिणय फुके हे भाजपमधील एक प्रभावशाली रणनीतीकार मानले जातात. मात्र, त्यांच्या याच रणनीतींमुळेच भंडारा जिल्ह्यात भाजपचा गड जमीनदोस्त झाला, असा थेट आरोप भोंडेकरांनी केला आहे.

एकेकाळी भंडारा जिल्ह्यात भाजपचे अनेक आमदार होते. मात्र आजची परिस्थिती पाहता, भाजपकडे या जिल्ह्यात एकही आमदार नाही – “भाजप शून्यावर!” या शब्दांत भोंडेकरांनी आपली खंत व्यक्त केली.

🔍 भोंडेकरांचे आरोप काय आहेत?

“आमच्या पक्षातील (शिवसेना शिंदे गट) कार्यकर्त्यांना तोडून त्यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न फुके यांनी वारंवार केला. पण यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद वाढली नाही. उलट, भाजपमध्ये आतून फूट पडली आणि जनता देखील नाराज झाली,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

या घडामोडींनी भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. भाजपच्या जिल्ह्यातील अस्तित्वावर आणि नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

🧩 राजकीय गुंतागुंत वाढतेय…

या आरोपांमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची गोची झाली आहे. कारण हे वक्तव्य केवळ वैयक्तिक नव्हते, तर पक्षाच्या धोरणांवर आणि गटबाजीवरच प्रश्न उपस्थित करणारे होते. भोंडेकरांचे हे विधान आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक  पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *