बनावट स्वाक्षरी करून ₹९६,५००चा बँकेतील व्यवहार उघड! बँकेतील बोगस व्यवहारावर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

wartaa.in
Share on

साकोली | प्रतिनिधी – बनावट स्वाक्षरी करून ₹९६,५००ची रक्कम बँकेतून उचलल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सानगडी शाखेत समोर आला असून, यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुंभळी येथील शेतकरी श्री. कारनदास बारसागडे यांचे खाते साकोली शाखेत असून, त्यांच्या संमतीशिवाय आणि सहीनुसार न करता सानगडी शाखेतून ही मोठी रक्कम उचलण्यात आली.

हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नाही तर बँकेच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेतील लाजिरवाणी त्रुटींचा खुलासा करणारा आहे. बनावट स्वाक्षरी करून रक्कम काढण्याचा प्रकार हा गुन्हा असून यामध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता नाकारता येत नाही, असे अनेकांनी सांगितले.

या प्रकरणाविरोधात तालुका शिवसेना साकोलीने आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार साकोली यांना निवेदन दिले. या निवेदनात बँकेच्या सानगडी शाखेतील CCTV फुटेज तपासून बनावट स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवण्याची आणि जबाबदारांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

“आर्थिक व्यवहारात अशा प्रकारची बोगस यंत्रणा रुजली तर सर्वसामान्य खातेदारांचा विश्वास उडेल. त्यामुळे या प्रकारावर कठोर कारवाई हीच शेतकऱ्यांसाठी न्यायाची दिशा ठरेल,” असे शिवसेना शहरप्रमुख नरेंद्र वाडीभस्मे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:

1. बँक शाखेतील CCTV फुटेज तपासून हकीकत समोर आणावी
2. संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका स्पष्ट करावी
3. बनावट स्वाक्षरी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा
4. यापूर्वी अशा प्रकारचे व्यवहार झाले असल्यास त्याची चौकशी करावी
5. सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

या आंदोलनात्मक निवेदनात शिवसेना शहरप्रमुख नरेंद्र वाडीभस्मे, राधेश्याम मुंगमोडे, उमेद गोडसे, पुष्कर करंजेकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी सहभाग घेतला. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा बँक व्यवस्थापक, जिल्हा निबंधक व सहाय्यक निबंधक साकोली यांना देण्यात आल्या असून, तात्काळ योग्य ती कारवाई व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या गंभीर आर्थिक घोटाळ्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बँक खात्यांची सुरक्षितता आणि पारदर्शकता या विषयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *