“मंदिराला दान देता, मग शाळेलाही द्या!” – राजेश चांडक यांचे भावनिक आवाहन

मोरगाव अर्जुनी (जि.गोंदिया) – “तुम्ही मंदिरात १० रुपये दान देता, तर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी किमान २ रुपये द्या,” असे मार्मिक व सडेतोड वक्तव्य राजेश चांडक यांनी आपल्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात केले. मोरगाव अर्जुनी येथे आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश चांडक हे आपल्या सेवा काळात शैक्षणिक विकासासाठी आग्रही राहिले. त्यांचं शिक्षणक्षेत्रातील योगदान आणि सामाजिक भान आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सत्कार सोहळ्यात त्यांनी शिक्षण संस्थांमध्ये लोकसहभाग वाढवण्याचे महत्त्व विशद केले.
“मंदिरात श्रद्धा असते, पण शाळेत भविष्य घडतं. आपण आपल्या गावाच्या शाळेचा विकास केला, तरच खऱ्या अर्थाने समाज उभा राहील,” असे ते म्हणाले. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनात विचारांचं वादळ निर्माण केलं.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी चांडक सरांच्या कार्याची प्रशंसा केली. विद्यार्थ्यांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
बारावीला जेमतेम पास झालो…
सायन्समध्ये गोंधळल्याने साकोलीला जाऊन कॉमर्सला ऍडमिशन घेतली. वर्गातून काही कारणांमुळे बहिष्कृत झालो… पण शिक्षण थांबवलं नाही. शिक्षण हाच श्वास बनवला. B.Com, M.Com, मग M.Phil पर्यंत शिक्षण घेतलं. कठीण काळातही आत्मविश्वास कायम ठेवत मी प्राध्यापक झालो. नंतर प्राचार्य म्हणून जबाबदारी घेतली आणि आज त्या प्रवासाचा टप्पा – सेवानिवृत्ती.
हा प्रवास केवळ माझा नाही, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, जो अपयशाला नाही म्हणतो आणि संघर्षालाही संधीमध्ये बदलतो. असे ते म्हणाले