गडकरींची शिंदेंच्या आमदाराला तंबी
भंडारा – “भंडाऱ्यात कडक शिस्तीचा अधिकारी नसेल तर आमदारही सुधारणार नाही,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट इशारा दिला. भंडाऱ्यातील बायपास लोकार्पण सोहळ्याच्या मंचावर गडकरी, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन एकत्र उपस्थित होते. याच मंचावर गडकरींनी एसपी हसन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना हसत हसत पण ठाम इशारा दिला.
गडकरी म्हणाले, “नुरुल हसन हे अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि कडक शिस्तीचे अधिकारी आहेत.” त्यावर भोंडेकर म्हणाले, “आम्ही त्यांना सांभाळून आहोत.” यावर गडकरी उत्तरले, “जर सांभाळलं नाही, तर मग आम्ही तुम्हाला सुधारूच!” – आणि हे वाक्य सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
गडकरींच्या हस्ते काल ८४,००० कोटींच्या सहापदरी मौदा-वाय जंक्शन उड्डाणपुलाचा, ७३५ कोटींच्या बायपास महामार्गाचा, तसेच १,१०० कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले.
नुरुल हसन हे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील असून, त्यांची शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी अशी ओळख आहे. त्यांनी भंडाऱ्यात बेकायदेशीर दारू, सट्टा, जुगार अड्डे, गोवंश तस्करी यावर कडक कारवाई केली. त्यांच्या कामगिरीचे याआधी वर्धा येथे असताना गडकरींनीही भरभरून कौतुक केले होते.

