धान खरेदी उद्दिष्ट वाढले: गोंदिया-भंडारा शेतकऱ्यांना दिलासा, खरेदीस मुदतवाढ!

wartaa.in
Share on

मुंबई, दि. ७ जुलै २०२५ – गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेबाबत मोठी घोषणा झाली असून, राज्य सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट तब्बल २० लाख क्विंटलने वाढवले आहे. ही खरेदी आता २० जुलै २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयामागे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरले.

राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये, २ जुलै रोजी आ. बडोले यांनी विधीमंडळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी अडचणीसंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी स्पष्ट केले की, उन्हाळी हंगामात भरघोस उत्पादन होऊनही मर्यादित उद्दिष्टामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदीबाहेर राहिले होते, त्यामुळे नुकसान आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

या गंभीर मुद्द्यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेत धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याचा निर्णय घेतला. आता शिल्लक राहिलेल्या धानाची खरेदी २० जुलैपर्यंत होणार आहे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

आ. बडोले म्हणाले, “हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळालेलं यश आहे. यामुळे पेरणीच्या काळात आर्थिक स्थैर्य लाभेल.”

गोंदिया व भंडारा हे धान उत्पादक जिल्हे असून येथील बहुतांश शेतकरी याच पिकावर अवलंबून आहेत. त्यामुळे धान खरेदी उद्दिष्टात वाढ होणे ही शेतकऱ्यांसाठी आशेची किरण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *