गोंदिया जिल्हा सहकारी बँक निवडणूक : सहकार पॅनल विजयी, पण दोन संचालकांच्या पाठिंब्यामुळे खळबळ!

wartaa.in
Share on

गोंदिया, दि. ०३ :
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वाधिक ११ जागा जिंकून बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे, परिवर्तन पॅनलमधील दोन संचालकांनी मत परिवर्तन करत सहकार पॅनलला खुले समर्थन दिले, त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी रंगत वाढली आहे.

२९ जून रोजी मतदान व ३० जून रोजी मतमोजणी पार पडलेल्या निवडणुकीत, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित सहकार पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेससह अन्य पक्षांनी बनवलेल्या परिवर्तन पॅनलने ९ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक चुरशीची ठरली, कारण यात खा. प्रफुल्ल पटेल आणि आ. नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

निवडीनंतर परिवर्तन पॅनलमधील पंकज यादव व अजय हलमारे यांनी सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर करत माजी आमदार राजेंद्र जैन यांच्याकडे पत्र सुपूर्द केले. त्यामुळे सहकार पॅनलचे बहुमत अधिक बळकट झाले असून, आगामी अध्यक्षपद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पाठिंब्यामुळे चर्चा अशीही सुरू आहे की, सहकार पॅनलनेच रणनीतीपूर्वक परिवर्तन पॅनलमधील काही सदस्यांना पाठवले होते का? या अनपेक्षित पाठिंब्याने राजकीय आणि सहकारी वर्तुळात खळबळ उडवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *