अन् त्यांनी स्वीकारले सामाजिक दायित्व
भंडारा जिल्ह्याच्या सामाजिक जडणघडणीस एक वेगळी दिशा देणारा निर्णय घेतला आहे जे. एम. पटेल महाविद्यालयात प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या यशपाल कन्हाडे यांनी. “मरणानंतरचा संकल्प – देहदान” हे त्यांनी आपल्या जीवनमूल्यांचे प्रकटीकरण म्हणून स्वीकारले आहे. आज जेव्हा समाजात अजूनही देहदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तेव्हा यशपाल कन्हाडे यांच्यासारख्या व्यक्तींचे धाडस एक नवा पायंडा निर्माण करणारे ठरते.
विज्ञाननिष्ठ विचारांची पायाभरणी
कन्हाडे यांनी स्पष्ट केले की, “आजही आपल्या समाजात मृत्यूनंतर देहदान करण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अंधश्रद्धांनी, रूढींनी आणि गैरसमजांनी भरलेला आहे. पण प्रत्यक्षात, अनेक रुग्ण मानवी अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही देह अभ्यासासाठी आवश्यक ठरतो.” विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन समाजात रुजवावा म्हणून त्यांनी स्वतःचा देह वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी पडावा असा निर्धार केला.
परंपरांना टाकून प्रगत विचारांचा स्वीकार
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात जन्मलेले यशपाल कन्हाडे नोकरीनिमित्त भंडाऱ्यात स्थायिक झाले. महाविद्यालयीन जीवनापासून ते ओबीसी चळवळीशी सक्रिय आहेत. बॅडमिंटन खेळाडू, जलतरणपटू आणि विपश्यना साधक अशी त्यांची ओळख असून, त्यांनी नेहमीच समाजहितासाठी पारंपरिक रुढींना बाजूला ठेवून कृती केली आहे. आईच्या निधनानंतर त्यांनी आपल्या मुलींना मुखाग्नी देऊ दिला होता — एक समानतेचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला.
सामाजिक कार्याची साखळी
कन्हाडे विविध सामाजिक संस्थांमधून कार्यरत असून, दलित-शोषितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. वैयक्तिक पातळीवरून समाजाच्या भल्यासाठी निर्णय घेणं हेच त्यांचं तत्व आहे. त्यामुळेच देहदानाचा निर्णय देखील केवळ स्वतःपुरता न ठेवता, समाजाला जागरूक करण्यासाठी घेतलेला आहे.
भविष्यासाठी दीपस्तंभ
यशपाल कन्हाडे यांचा देहदानाचा निर्णय हे केवळ एक वैयक्तिक कृत्य नाही, तर सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ आहे. त्यांनी मांडलेला विचार हा नव्या पिढीला विचार करायला आणि कृती करायला भाग पाडणारा आहे.

