महात्मा गांधी पुतळ्यावर गुलाल उधळल्याचा प्रकार
साकोली तालुक्यातील जुने पंचायत समिती परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सोमवारी २८ जुलै रोजी महापुरुषांच्या सन्मानावर घाला घालणारा प्रकार घडला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर एका अज्ञात इसमाने अतीउत्साहाच्या भरात गुलालाची उधळण केली. परिणामी महात्मा गांधींच्या पुतळ्याचा चेहरा गुलालामुळे विद्रुप झाला.
हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच तो झपाट्याने सोशल मिडियावर व्हायरल झाला. घटनेची गंभीर दखल घेत, साकोली पोलीस ठाण्याचे नायक चंदू थेर व आशिष परचाके यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सायंकाळी स्वतः पुतळ्याची स्वच्छता करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पूर्ववत स्वरूप दिले.
स्थानिक नागरिकांत यामुळे संतापाची भावना पसरली. काही नागरिकांनी व्यक्त केले की, “महात्मा गांधी यांच्यासारख्या थोर महापुरुषांच्या स्मारकांवर असा प्रकार करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.”
पोलिसांनी याप्रकरणी माहिती दिली आहे की, कोणत्याही सार्वजनिक किंवा शासकीय ठिकाणी उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांवर रंग, गुलाल, फुलं वगैरे टाकणं किंवा त्यांच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारे हानी पोहचवणं हे कायद्याने गुन्हा आहे.
सदर प्रकार कोणत्या उद्देशाने झाला हे अद्याप अस्पष्ट आहे, पण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करताना सार्वजनिक मालमत्तेचा आदर राखावा. पुढील तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
हा प्रकार एक इशारा आहे की, सामाजिक साक्षरतेबरोबरच राष्ट्रीय प्रतीकांबद्दलचा आदर टिकवण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार केला जात असतानाच, त्यांच्या प्रतीकांबाबत आदर राखला गेला पाहिजे, हे स्पष्ट होतं.


