निकृष्ट दर्जाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांनी गुदमा रेल्वे स्थानकावर नव्याने उभारण्यात आलेल्या ओव्हरब्रिजच्या बांधकामाची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षा व्यवस्था आणि प्रवासी सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेतला.
निरीक्षणादरम्यान उघड झालं की, ओव्हरब्रिजवर जलनिकासीची कोणतीही व्यवस्था नाही, तसेच रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उघडी पडली असून, त्यामुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. डॉ. पडोळेंनी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट करत, संबंधित विभागाने यावर कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
“रेल्वे विभागाने केलेले हे काम अतिशय निकृष्ट असून, हे जनतेच्या सुरक्षेशी खेळ करण्यासारखे आहे,” असं म्हणत त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने, डॉ. पडोळे यांनी जनतेच्या सोयी-सुविधांसाठी स्वत: लक्ष ठेवणार असल्याचं ठणकावून सांगितलं. तसेच, “जर लवकरात लवकर ओव्हरब्रिजचं काम पूर्ण झालं नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी गोंदिया शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. योगेश अग्रवाल (बापू), APMC संचालक धनलाल ठाकरे, NSUI जिल्हाध्यक्ष अमन तिगाला, किशोर शेंडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष जीत गौतम, उमेश मोहतूरे, अंकुश गजभिये, यकांश चव्हाण व गुदमा गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

