बँक निवडणुकीपूर्वी मोठं राजकीय समीकरण? नाना-भोन्डेकर भेटीनं वाढली उत्सुकता!
भंडारा :
राजकारणात नेहमीच नवे समीकरणं निर्माण होत असतात. भंडारा जिल्ह्यात अशाच एका अनपेक्षित राजकीय भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विद्यमान शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोन्डेकर यांनी नुकतीच घेतलेली भेट सध्या जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी वर्तुळात गाजते आहे.
या दोघांची भेट झाल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे ही भेट भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने यामागे मोठं राजकीय गणित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाना पटोले हे काँग्रेसचे जेष्ठ व प्रभावशाली नेते आहेत. तर नरेंद्र भोन्डेकर हे शिवसेना (शिंदे गट) तर्फे निवडून आलेले आमदार असून जिल्ह्यात त्यांची ठाम पकड आहे.
या दोघांच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही फक्त औपचारिक भेट होती की जिल्हा बँकेतील सत्ता परिवर्तनाची पूर्वतयारी? – या प्रश्नावर अद्यापही मौन आहे.
पुढील काही दिवसांत या चर्चेचे पडसाद सहकार क्षेत्रात उमटणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

