संघटनेची मुळे कार्यकर्त्यांच्या श्रमाने आणि समर्पणाने घट्ट रोवली जातात – राजकुमार बडोले

wartaa.in
Share on

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी-मोर तालुकाच्या वतीने काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात एक भव्य कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्व एकत्र येऊन संघटनाच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले,

> “संघटनेची मुळे कार्यकर्त्यांच्या श्रमाने आणि समर्पणाने घट्ट रोवली जातात. कार्यकर्ते हेच खरी ताकद आहेत, आणि विकासाच्या प्रत्येक पावलावर मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहीन.”



त्यांनी स्पष्ट केले की, गावोगावी लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाय शोधणे, हेच संघटन बळकट होण्याचे मुख्य कारण आहे.

जिल्हाध्यक्ष प्रेमजी रहांगडाले यांनी संघटनात्मक मार्गदर्शन करताना सांगितले की, मा. प्रफुल पटेल यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तालुक्यातील विकासकामांना नवी गती मिळेल. मोठ्या नेतृत्वामुळे विकासाच्या संधी अधिकाधिक वाढतील आणि जनतेचा विश्वास दृढ होईल, असेही ते म्हणाले.

या बैठकीला तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मीताई तुरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, ओबीसी जिल्हाध्यक्ष किशोरजी तरोणे, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यशवंतजी परशुरामकर, दि लक्ष्मी राईस मिल अध्यक्ष भोजरामजी रहेले, नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, महिला तालुकाध्यक्ष सुशीलाताई हलमारे, युवक तालुकाध्यक्ष किशोरजी ब्राह्मणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रतिरामजी राणे, नगरपंचायत सभापती दाणेशजी साखरे, योगेशजी नाकाडे, दादाजी संग्रामे, सुखदेवजी मेंढे, आकाश ठवरे, सुधांशु मेहता यांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आणि त्यांना औपचारिकरित्या नियुक्तीपत्र देण्यात आले. ही प्रक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरली.

कार्यक्रमाचे संचालन उद्धवजी मेंहदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय शहारे यांनी मानले. विशेष म्हणजे, या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना राखी बांधून ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला.

या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी-मोर तालुका आगामी काळात संघटनवाढ आणि विकासकामांच्या गतीसाठी ठोस पावले उचलणार आहे. जनतेच्या हितासाठी, आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणासाठी, पक्षाच्या प्रत्येक स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *