झोपेत हार्ट ॲटॅक येतो का? भीतीदायक सत्य उघड! लक्षणं वेळेत ओळखा आणि जीव वाचवा
हार्ट ॲटॅक झोपेत येतो का? हा प्रश्न हल्ली जास्त ऐकू येतोय कारण अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये रात्री गाढ झोपेत असतानाच व्यक्तीला हार्ट ॲटॅक येतो आणि अनेकदा तात्काळ मृत्यूही ओढवतो. हे अत्यंत धक्कादायक असलं, तरी यामागे काही ठोस वैद्यकीय कारणं आहेत, जी वेळीच समजून घेतल्यास या संकटापासून बचाव होऊ शकतो.
झोपेत हार्ट ॲटॅक येण्याची कारणं काय?
१. स्लीप अॅप्निया आणि लठ्ठपणा:
रात्री झोपताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, ज्याला स्लीप अॅप्निया म्हणतात. विशेषतः लठ्ठ व्यक्तींमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो. झोपेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, त्यामुळे बीपी आणि हार्ट रेट अचानक वाढतो. हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि परिणामी रात्रीचा हार्ट अटॅक होऊ शकतो.
२. हार्मोन्सचा असंतुलित प्रभाव:
रात्री विशेषतः पहाटेच्या सुमारास शरीरात ‘कैटेकोलामाइन्स’ आणि ‘कॉर्टिसोल’ या तणाववर्धक हार्मोन्सचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तदाबात चढउतार होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. संशोधनानुसार, बहुतांश हार्ट अटॅक पहाटे ४ ते ६ दरम्यान घडतात.
३. रक्ताच्या गाठी (क्लॉट्स):
रात्रीच्या वेळी शरीर विश्रांती घेत असताना रक्तवाहिन्या आकुंचित होतात. या काळात प्लेटलेट्स चिकटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे रक्ताच्या गाठी तयार होतात आणि हृदयाच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅक येऊ शकतो.
हार्ट ॲटॅक येण्यापूर्वीची महत्त्वाची लक्षणं:
✅ छातीत दडपण किंवा वेदना
✅ झोपेतून दचकून जाग येणं
✅ अनियमित धडधड किंवा बेचैनी
✅ थंडीशीर घाम येणं
✅ मळमळ, उलटीचा त्रास
✅ जबडा, मान किंवा डाव्या हातात वेदना जाणवणं
लक्षणं दिसल्यास काय कराल?
हार्ट ॲटॅक ही काही क्षणात जीव घेणारी स्थिती असू शकते. त्यामुळे वरीलपैकी कुठलीही लक्षणं जाणवली, तर ती दुर्लक्षू नका. तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या. हृदयाची नियमित तपासणी, हेल्दी आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे हाच सर्वोत्तम बचावाचा मार्ग आहे.

