भाजपातून थेट जिल्हा प्रमुखपदावर…! कोण आहे शिवसेनेत आलेला ‘तो’ नेता?
भंडारा :
राजकीय वाऱ्यांची दिशा बदलत असतानाच, लाखनी तालुक्यातील ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी तालुका अध्यक्ष पद्माकर बावनकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करताच, त्यांना थेट जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रविवार, १५ जून रोजी भंडाऱ्यातील मंगलमूर्ती सभागृहात आयोजित पूर्व विदर्भ पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते बावनकर यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले.
भाजपमध्ये सलग दोनदा लाखनी तालुकाध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री म्हणून काम केलेल्या बावनकर यांनी संघटनात्मक पातळीवर मोठं योगदान दिलं आहे. मात्र, पक्षात सुरु असलेली मनमानी व गोंधळ यामुळे त्यांनी आठवडाभरापूर्वी भाजपाला रामराम करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
या नियुक्तीवेळी माजी आमदार मनोहर चंद्रीकापुरे, सहसराम कोरेटे, सुयश चंद्रीकापुरे, अनिल गायधने, संजय कुंभलकर, तसेच पूर्व विदर्भातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.

