सडक अर्जुनी अपघात: SBI बँकेसमोर झाड कोसळून दोन ठार, एक कार थोडक्यात बचावली

गोंदिया, 09 जुलै – सडक अर्जुनी येथील SBI बँकेसमोर आज सकाळी घडलेली दुर्घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली. मुसळधार पावसामुळे भुसभुशीत झालेली जमीन आणि कमकुवत झाडांची मुळे, यामुळे अपघात झाला.
आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर, SBI बँकेसमोरच्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक जुने आणि मोठे झाड समोरून येणाऱ्या ओमनी कारवर कोसळले. या भीषण अपघातात सडक अर्जुनीचे रहिवासी वासुदेव खेडकर आणि आनंदराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर काही क्षणातच मागून येणाऱ्या ईनोव्हा कारचा संतुलन बिघडले व ती झाडावर आदळली. मात्र सुदैवाने ईनोव्हा कारमधील सर्व प्रवासी बचावले. घटनास्थळी स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, पण झाड एवढे प्रचंड होते की ओमनी कारमधील दोघांना वाचवणे शक्य झाले नाही.
या दुर्घटनेनंतर नागरिकांनी रस्त्याच्या कडेला असलेली जुनी व धोकादायक झाडे त्वरित हटवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. घटनास्थळी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.