अतिक्रमण खुलेआम सुरूच!
साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रात अधिकाऱ्यांचा धाक संपला का?
साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रात सध्या प्रशासनाचा धाक पूर्णतः संपल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी गरजू व गरीब लोकांनी आपल्या उपजीविकेसाठी तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक जागांवर झोपड्या किंवा तंबू टाकून छोटेखानी व्यवसाय सुरू केले होते. नगरपरिषद व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त कारवाईमुळे यापैकी बरेच अतिक्रमण वेळोवेळी हटवले गेले.
मात्र, आजच्या परिस्थितीत हेच नियम धनदांडग्या लोकांसाठी लागू होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सध्या खुलेआमपणे दिवसा-दिवसा सार्वजनिक जागेवर टिनाचे शेड टाकून, स्लॅब घालून पक्के बांधकाम केले जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व अतिक्रमण नवीन बस स्टॉपच्या समोर, टेलिफोन एक्सचेंज आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) च्या कार्यालयासमोर खुलेपणे चालू आहे. या ठिकाणी ट्रकमधून रेती व गिट्टी खाली केली जाते आणि तेथेच फ्लोरिंग करून पक्के शेड उभारले जात आहेत.
हे अतिक्रमण करणारे लोक आधीपासूनच बस स्टॉपच्या गेटशेजारी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटून सार्वजनिक जागेचा वापर करत आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण केवळ नव्याने नव्हे, तर जुनेही असून आता ते अधिकच बळकट होत चालले आहे.
आज दि. 05 ऑगस्ट 2025 रोजी, NHAI चे काही कर्मचारी या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या चौकशीसाठी आले असता, संबंधितांनी त्यांना धमकी दिली आणि जबरदस्तीने त्या ठिकाणाहून हाकलून लावले. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, साकोली-सेंदूरवाफा क्षेत्रात कायद्याचा धाक उरलेला आहे का?
जर काही लोकांना राजकीय पाठबळाच्या जोरावर सार्वजनिक जागांवर पक्के अतिक्रमण करण्यास मोकळीक दिली जात असेल, तर मग जे गरीब व गरजू नागरिक पूर्वीपासून तात्पुरते झोपडपट्टी स्वरूपात राहत होते, त्यांनाही पक्के बांधकाम करण्याची परवानगी द्यावी का?
ही संपूर्ण घटना प्रशासनासाठी तसेच लोकप्रतिनिधींकरिता एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. अतिक्रमणाविरोधातील भूमिका केवळ गरीबांसाठी का? आणि बड्या लोकांना अंधानंद का?

