सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला
राजकुमार बडोले फाउंडेशनचा तीव्र निषेध
भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या दिशेने न्यायालयीन कारवाईदरम्यान करण्यात आलेल्या बूटफेकीच्या प्रयत्नाचा प्रकार हा भारतीय न्यायव्यवस्था, लोकशाही मूल्ये आणि संविधानाच्या प्रतिष्ठेवर थेट हल्ला आहे. या घटनेचा राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला असून, फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
न्यायासन हे केवळ एका व्यक्तीचे स्थान नसून राष्ट्राच्या न्यायबुद्धीचे आणि संविधानिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा संस्थेवर हल्ला करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भारतीय लोकशाहीचा अपमान होय. विचारभेद आणि असंतोष हे लोकशाहीत स्वाभाविक असतात, मात्र त्यांची अभिव्यक्ती हिंसा, अवमान किंवा अपमानाच्या स्वरूपात होत असेल, तर ती प्रवृत्ती समाजात अराजकता आणि अविश्वास निर्माण करते, असे फाउंडेशनने स्पष्ट केले.
या घटनेतून काही तथाकथित “सनातनी घटकांची असहिष्णु आणि नीच प्रवृत्ती” समोर आली आहे, जी लोकशाही संवादाच्या मूलावरच घाव घालणारी आहे. अशा हिंसक कृती करणे हे केवळ कायद्याचा नव्हे तर भारतीय संस्कृतीतील संयम, संवाद आणि आदराच्या परंपरेचा देखील अपमान आहे.
राजकुमार बडोले फाउंडेशनने केंद्र सरकार आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना आवाहन केले आहे की — या घटनेतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी न्यायालयीन सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.
फाउंडेशनने खेद व्यक्त केला की, इतक्या गंभीर घटनेनंतरही संबंधित वकिलावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. न्यायालयाने औपचारिक तक्रार केली नाही म्हणून पोलीस कारवाई करत नाहीत, हे कारण स्वीकारार्ह नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंस्फूर्त कार्यवाही करणे हे पोलीस यंत्रणेचे कर्तव्य आहे, असेही फाउंडेशनने ठामपणे नमूद केले.
फाउंडेशनच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि संविधानाचा गौरव टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विवेक, संयम आणि सन्मान यांच्या मार्गावर राहणे हेच लोकशाहीचे खरे रक्षण आहे.
या वेळी निवेदन सादर करताना फाउंडेशनचे सचिव प्रशांत शहारे, राकेश भास्कर, हितेश डोंगरे, मिथुन टेंभुर्णे, टुनेश तरजुले, डायमंड डोंगरे, अजय शहारे, संजीव लोणारे, अमित राऊत, हर्षद साखरे, अमोल नंदेश्वर, अक्षय जांभूळकर, सम्यक रामटेके, विपील डोंगरे, राकेश जनबंधू, विक्रम जनबंधू, किशोर बलोदे, जयराम सांगोळकर, ध्रुव तरजुले, साजन शहारे, योगेश सांगोळकर, चंदू शहारे, बिंबिसार शहारे, आस्तिक बनसोड, शैलेंद्र शहारे, मिलिंद डोंगरे, सुरेश शहारे, विनोद सांगोळे, अनिल मेश्राम, नागेश वैद्य, अश्वजीत राऊत, अमन राऊत, छोटू वैद्ये, जनार्धन डोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकुमार बडोले फाउंडेशनच्या या निषेधातून भारतीय लोकशाही, न्यायसंस्था आणि संविधानाच्या संरक्षणासाठीची जनभावना स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे.

