वरंधा घाटात कार खोल खड्ड्यात उलटली

wartaa.in
Share on

पुणे :
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. हिर्डीशी गावाजवळील हराळीचा माळ या वळणदार ठिकाणी एक कार खोल खड्ड्यात जाऊन उलटली. घाट चढत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने, कारमधील चारही प्रवासी थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातग्रस्त कार (MH 14 EY 4089) महाडहून भोरकडे जात होती. घाटातील चढावात अंदाज चुकल्याने चालकाने नियंत्रण गमावले आणि कार थेट रस्त्यालगत असलेल्या मोरीतील खड्ड्यात कोसळली. कार उलटल्यानंतर घटनास्थळी हिडशी गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले.

जखमी प्रवाशांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या वाहनातून पुढचा प्रवास केला. कारमध्ये मोठे तांत्रिक नुकसान झाल्याने ती उचलण्यासाठी क्रेन मागवण्यात आला.

दरम्यान, भोर-महाड मार्गावर सध्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून रस्त्याच्या एका बाजूला वाहतूक वळवण्यात आली आहे. संपूर्ण रस्ता खोदलेला असल्याने अशा अपघातांची शक्यता अधिकच वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे योग्य सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.

या घटनेनंतर घाट परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वेळेत उपाय न केल्यास भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *