आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन
ग्रामीण आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने झाशीनगर (ता. अर्जुनी मोरगाव) येथे नविन आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन नुकतेच आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडले. या उपकेंद्रामुळे स्थानिक ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध होतील आणि रुग्णांना लांबच्या प्रवासाचा त्रास टळणार आहे.
या भूमिपूजन समारंभास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती सौ. पौर्णिमाताई ढेंगे, माजी उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. यशवंतजी गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष लोकपालजी गहाने, पं.स. सदस्या श्रीमती चंद्रकलाताई ठवरे, सरपंच सौ. आशाताई गदवार यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नांची दखल घेत उपकेंद्रामुळे मिळणाऱ्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. आमदार बडोले यांनी आरोग्य ही प्राथमिक गरज असून ही सेवा दारात यावी या हेतूने उपकेंद्राचा पाठपुरावा केला असल्याचे सांगितले.

