धान खरेदी आणि थकीत चुकाऱ्यांमुळे शेतकरी अडचणीत- आ. राजकुमार बडोले

wartaa.in
Share on

मुंबई, २ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. अर्जुनी मोरगावचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडत धान खरेदी थांबवली गेल्याचा आणि थकीत चुकाऱ्यांचा विषय जोरदारपणे उपस्थित केला.

बडोले यांनी स्पष्टपणे सांगितले की, यंदा गोंदिया-भंडारा जिल्ह्यांमध्ये उन्हाळी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले, तरी शासनाकडून खरेदी प्रक्रिया अर्धवट थांबवली गेली आहे. त्यामुळे हजारो क्विंटल धान शेतकऱ्यांच्या गोदामात पडून आहे. हवामान बदलांमुळे धान खराब होण्याची शक्यता वाढत आहे आणि विक्री न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“धान खरेदीची मर्यादा तातडीने वाढवावी आणि उर्वरित धान शेतकऱ्यांकडून खरेदी करावी,” अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर, आदिवासी विकास महामंडळाने आधीच खरेदी केलेल्या धानाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, ही बाबही त्यांनी अधिवेशनात मांडली.

“पेरणीचा हंगाम सुरू असताना पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सरकारने हे थकीत चुकारे तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करावेत,” असेही बडोले म्हणाले.

गोंदिया व भंडारा हे धान उत्पादक भाग असून, येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शासकीय खरेदीतील अडथळे आणि निधी वितरणातील विलंब शेतकऱ्यांसाठी गंभीर संकट ठरत आहेत.

आता सरकार या मागण्यांवर कितपत तत्परतेने पावले उचलते, याकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *