सालेबर्डी रोजगार हमी घोटाळा थेट मंत्रालयात गेला, पण दोषींवर अजूनही कारवाई शून्य!

wartaa.in
Share on

सालेबर्डी (ता. मोहाडी, जि. भंडारा) –
रोजगार हमी योजनेतील घोटाळा सालेबर्डी ग्रामपंचायतीत उघडकीस आला असून, लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, रोजगार सेवक, अभियंता आणि गटविकास अधिकारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थ या प्रकरणात न्यायासाठी पाठपुरावा करत आहेत. जिल्हाधिकारी, CEO आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रारी दाखल करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने नाराज ग्रामस्थांनी आता थेट मंत्रालय गाठले आहे.
दिनांक २ जुलै २०२५ रोजी तक्रारदार अक्षय वाहने यांनी मुख्यमंत्री सचिवालय, ग्रामीण विकास मंत्री आणि सामाजिक न्याय विभागाकडे लेखी तक्रार व संबंधित पुरावे सादर केले.

सालेबर्डी ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेत अपहार, बनावट हजेरी, चुकीचे बिलिंग आणि कामे न करताही खर्च दाखवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यात शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट दिसते. मात्र जिल्हास्तरावर याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे, आता या गंभीर प्रकरणाची चौकशी थेट वरिष्ठ स्तरावर होण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांचा ठाम सवाल आहे —
❝आता इतक्या वरिष्ठ पातळीवर तक्रार गेल्यानंतर दोषींवर कारवाई होणार की नाही? चौकशी कधी सुरू होणार? आणि दोषींना शिक्षा होईल की नाही?❞
हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *